एखाद्या छोट्याशा गावातून मुंबई येणं, अनेक नकार पचवून इथे टिकून राहणं आणि सिनेइंडस्ट्रीत काम मिळवणं सोपं नाही. अभिनेते मनोज बाजपेयी यांनी अभिनेता व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते, पण मित्रांनी साथ दिली आणि त्यांनी यश मिळवलं. आता ते ओटीटीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत.
बिहारमधील बेलवा या छोट्याशा गावात मनोज बाजपेयींचा जन्म झाला. छोट्या शहरातून आलेल्या राज बब्बर यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमावल्याची बातमी मनोज यांना अभिनेता बनण्याची प्रेरणा मिळाली. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी घर सोडलं, मात्र इंडस्ट्रीत नाव मिळवण्याआधी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. “मी १७ व्या वर्षी माझं गाव सोडलं, तो खूप कठीण काळ होता. ती चार वर्षे ४० वर्षांसारखी होती. काहीच चांगलं घडत नव्हतं. एकदा मला एक मालिका, एक कॉर्पोरेट चित्रपट, एक डॉक्युड्रामा असे प्रकल्प मिळाले, पण एका दिवसात मला सगळ्यांमधून काढून टाकण्यात आलं होतं,” असं एका मुलाखतीत मनोज यांनी सांगितलं होतं.
मुंबईत आल्यावर मनोज एका चाळीत दोन जणांबरोबर राहत असे. त्या वेळेची आठवण सांगत ते एकदा म्हणाले होते, “माझा पूर्ण दिवस खूप व्यग्र असायचा. मी एका चाळीत दोन लोकांसह राहायचो. मी सहा महिन्यांनी परत आल्यावर पाहिलं की तिथं किमान १० लोक झोपलेले होते. त्यात तिग्मांशू धुलिया, व्हिक्टर (विजय कृष्ण आचार्य) होते, त्यांनीही आपला बराचसा वेळ तिथे घालवला होता.” मनोज बाजपेयी यांनी मुंबईत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते समभाव थिएटर ग्रूप आणि नंतर बॅरी जॉन ग्रूपमध्ये सामील झाले. नाटकांमध्ये अभिनय करण्यासाठी आणि कार्यशाळेत त्यांना मदत करण्यासाठी मनोज यांचं समर्पण पाहून त्यांना १८०० रुपये महिना पगारावर सहाय्यक म्हणून कामावर घेतलं गेलं.
Video: अमृता फडणवीस लेकीसह जामनगरहून परतल्या माघारी, दिविजाचा ग्लॅमरस एअरपोर्ट लूक चर्चेत
मनोज बाजपेयी यांना अनेकदा नकारांचा सामना करावा लागला, त्यांना एनएसडीमधूनही रिजेक्ट करण्यात आलं होतं, मग त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. “सर्वात कठीण काळ तो होता जेव्हा माझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी निवड झाली नाही. मी सातवीत असल्यापासूनच हे स्वप्न पाहत होतो, पण ते पूर्ण न झाल्याने मी उद्ध्वस्त झालो होतो. मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. माझे मित्र इतके घाबरले होते की ते पाचही जण माझ्या शेजारी झोपायचे आणि मला कधीच एकटे सोडायचे नाही,” असं मनोज एका मुलाखतीत म्हणाले होते.
मनोजने शेवटी ‘द्रोहकाल’ मधील एका मिनिटाच्या भूमिकेतून आणि १९९४ मध्ये शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’मध्ये एका डाकूच्या भूमिकेतून पदार्पण केलं. अशाच काह भूमिकांनंतर, त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या १९९८ च्या ‘सत्या’ या क्राईम ड्रामामध्ये गुंड भिकू म्हात्रेचं पात्र साकारलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘अलिगढ’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मनोज यांना त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.
मनोज बाजपेयींनी ‘द फॅमिली मॅन’ या स्पाय थ्रिलर सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केलं. ही सीरिज खूप गाजली, नंतर दुसऱ्या भागातही मनोज मुख्य भूमिकेत दिसले. त्यांनी ओटीटीवर ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘किलर सूप’, ‘गुलमोहर’सह अनेक चित्रपट व सीरिज केल्या आणि ते ओटीटीचे राजा झाले. ते एका सीरिजसाठी १० कोटी रुपये मानधन घेतात. मनोज ओटीटीवर सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत.