हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. एका छोट्याश्या गावातून येत मनोज बाजपेयींनी बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मनोज बाजपेयींच्या चित्रपटाबरोबरच त्यांच्या संपत्तीची अनेकदा चर्चा होते. बाजपेयींकडे एकूण १७० कोटी रुपयांची संपत्ती असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांनंतर बाजपेयी यांनी प्रतिक्रिया देत आपल्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादावरुन कंगना रनौत भडकली: म्हणाली, “असे चित्रपट…”

एका मुलाखतीत बाजपेयींना त्यांच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्याकडे १७० कोटी रुपयांची संपत्ती आहे हे खरं आहे का? यावर बाजपेयी उत्तर देत म्हणाले, “बाप रे बाप ‘अलिगड’ आणि ‘गली गुलेयां’ करून? अजिबात नाही. पण हो, देवाच्या कृपेने माझे आणि माझ्या पत्नीचे म्हातारपण नीट जाईल याची खात्री आहे. आणि माझी मुलगीपण सेटल होईल,” असं बाजपेयी म्हणाले.

हेही वाचा- Video : “आता तिसरी बायको…”; आमिर खान आणि फातिमा शेखचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून चर्चांना उधाण

मनोज बाजपेयी यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडला आहे. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. याबरोबरच मनोज यांच्या ‘द फॅमिलीमॅन सीझन-३’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.