आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते म्हणजेच मनोज बाजपेयी. मनोज बाजपेयींनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयी यांनी स्ट्रगलिंगच्या काळात वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांची भेट घेतली होती, तेव्हा कशाप्रकारे त्यांच्या एका सल्याने मनोज बाजपेयी यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला याबदल्लचा किस्सा त्यांनी या मुलाखतीत सांगितला आहे.
रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाले, “मी व्हिव्हियन रिचर्ड्स यांना महेश भट्ट यांच्या घरी भेटलो होतो. मी तेव्हा त्यांच्या ऑटोग्राफ घेतला होता. तेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम शोधत होतो. भट्ट साहेबांना मी खूप आवडायचो म्हणून त्यांच्या घरी माझं येणं जाणं असायचं.”
हेही वाचा… झी मराठीवरील ‘या’ लोकप्रिय मालिकेचा आता हिंदीमध्ये होणार रिमेक; कधी, कुठे, कशी पाहता येईल?
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी व्हिव्हियनला म्हणालो की, मला असं वाटतं की तुम्ही जगातले सर्वोत्कृष्ट खेळाडू आहात. जरी मी तेव्हा सुनील गावस्करांचा फॅन होतो तरी मी त्यांना असं म्हणालो होतो. तेव्हा ते म्हणाले होते, नाही सुनील गावस्कर जगातले सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही असं कसं बोलू शकता? त्यावेळेस व्हिव्हियन यांनी मला खूप महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मी जरी जगातील सर्वोत्कृष्ट संघाचा एक भाग असेन तरी सुनील गावस्कर सर्वोत्कृष्ट गोलंदाजांविरुद्ध खेळले आहेत, त्यांनी अनेक शतकं पूर्ण केली आहेत आणि त्यांची कारकीर्ददेखील खूप मोठी आहे.”
“व्हिव्हियन जेव्हा हे म्हणाले, तेव्हा मला वाटलं, असं फक्त व्हिव्हियनच म्हणू शकतात. एक लेजंडच दुसऱ्या लेजंडबद्दल असं बोलू शकतो.”
“मग मी त्यांना असं विचारलं की, जर ते स्वत:ला अभिनयातील व्हिव्हियन रिचर्ड्स मानत असतील तर या फिल्म इंडस्ट्रीमधलं गावस्कर कोण असेल? यावर ते म्हणाले, मला असं वाटतं की इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमिताभ बच्चन हे असतील.”
“आताचे विराट कोहली आणि रोहित शर्मा म्हणजे राजकुमार राव, जयदीप अहलावत, विजय वर्मा, गुलशन देवैया, जतिन गोस्वामी हे आहेत, असंही ते म्हणाले.”
हेही वाचा.. “आयुष्य हेच एक हॉटेल…”, ‘नाच गं घुमा’च्या लेखिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स ८० च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. रिचर्ड्स यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना नीना यांनी मुलगी मसाबा गुप्ताला जन्म दिला.
दरम्यान, मनोज बाजपेयींच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा ब्लॉकबस्टर प्राइम व्हिडीओ शो ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. तसेच ‘भैय्याजी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत पाच कोटींची कमाई केली आहे.