Manoj Bajpayee : भारतीय सिनेसृष्टीत गुन्हेगारी जगत, अंडरवर्ल्डवरील आधारित अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील काही चित्रपटांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. याच पठडीतील एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटात मनोज बाजपेयी, शेफाली शाह, उर्मिला मातोंडकर, आणि जे. डी. चक्रवर्ती यांसारखे अनेक कलाकार झळकले होते.

मनोज वाजेपेयींच्या मानधनावर हंसल मेहता यांचं भाष्य

मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित ‘सत्या’ चित्रपटात गँगस्टर भिकू म्हात्रेची भूमिका साकारून अभिनेते मनोज वाजपेयी यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. भिकू म्हात्रे या भूमिकेमुळे मनोज यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. पण तुम्हाला माहिती आहे का मनोज वाजपेयी यांना ‘सत्या’ चित्रपटासाठी किती रुपये मानधन मिळाले होते? ‘पिंकव्हिला’च्या एका मुलाखतीत मनोज वाजपेयींच्या ‘सत्या’ चित्रपटाच्या मानधानाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ‘सत्या’साठी मनोज वाजपेयी यांना किती मानधन मिळाले होते हे सांगितलं आहे.

मनोज वाजेपेयींना फक्त एक रुपया दिल्याचं हंसल मेहतांचं भाष्य

यावेळी हंसला मेहता यांनी म्हटलं की, “मी मनोजला त्या चित्रपटासाठी १ रुपया दिला होता. भरपूर दारू पिल्यानंतर, मी अनुराग कश्यपलाही १ रुपया दिला, मी सौरभ शुक्लाला काहीही दिले नाही आणि सौरभने याचे लिखाण केले होते. अनुरागला या चित्रपटात लिखाण करायचे होते; पण ते शक्य झालं नाही. कालांतराने तो ‘सत्या’मध्ये व्यग्र झाला.” दरम्यान, एका जुन्या मुलाखतीत मनोज वाजपेयींना ‘सत्या’ चित्रपट त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट असल्याचं म्हटलं होतं.

‘सत्या’मधील भिकू म्हात्रे म्हणजेच अभिनेते मनोज वाजपेयी (फोटो सौजन्य : इंटरनेट)

मनोज वाजपेयींना ‘सत्या’च्या यशानंतर चांगल्या भूमिका मिळू लागल्या

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत मनोज वाजपेयींनी सांगितलं होतं की, त्यांनी ‘सत्या’ चित्रपट निवडला तेव्हा इंडस्ट्रीमध्ये त्यांची परिस्थिती चांगली नव्हती. ते फक्त छोट्या भूमिका करत होते आणि पैसे कमवण्यासाठी त्यांचा खूप संघर्ष सुरू होता. पण ‘सत्या’ने त्यांच्या कारकिर्दीला नवं वळण आलं. ‘सत्या’च्या प्रचंड यशानंतर त्यांना अनेक चांगल्या भूमिका मिळू लागल्या. तसंच ‘सत्या’मुळे त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेतही बरीच वाढ झाली.

मनोज वाजपेयींच्या ‘सत्या’ची कमाई १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती

दरम्यान, ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कमाईच्या बाबतीतही हिट ठरला. अडीच कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाचे संवाद आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताच्या नवीन पिढीच्या अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतो. लोक या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याची मागणी करताना दिसतात.