अभिनेता मनोज बाजपेयी आणि अभिनेत्री शबाना रझा यांच्या लग्नाला आता जवळजवळ १८ वर्षे झाली आहेत. त्यांचे लग्न आंतरधर्मीय होते. मनोज यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाचा आंतरधर्मीय लग्नाला विरोध नव्हता. ‘किलर सूप’च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मनोज यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
‘जिस्ट’शी बोलताना मनोज म्हणाले, “आमच्या लग्नाला घरी कोणीच विरोध केला नाही, कारण माझे पालक मोकळ्या विचारांचे होते आणि तिचे पालकही मोकळ्या विचारांचे होते. त्यामुळे आम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दोन लोकांना त्यांचे जीवन एकत्र घालवायचं आहे. त्यामुळे जे लोक समजदार आहेत, त्यांना कधीही अडचणी येत नाहीत आणि जे लोक समजदार नाहीत, त्यांना देवसुद्धा मदत करू शकत नाहीत.”
“मी ब्राह्मण कुटुंबातून आलो आहे. तिचं कुटुंबही प्रतिष्ठित होते, त्यांचंही समाजात नाव होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आमच्या लग्नाबद्दल कधीही आक्षेप घेतला नाही. आतापर्यंत कधीही नाही. तिला ती मुस्लीम असल्याचा अभिमान आहे आणि मला मी हिंदू असल्याचा अभिमान आहे. यावरून आम्ही कधीच एकमेकांशी भांडत नाही,” असं मनोज बाजपेयी बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.
मनोज यांची पत्नी शबानाने १९९० च्या दशकात काही चित्रपटांमध्ये काम केलं. यामध्ये ‘करीब’, ‘होगी प्यार की जित’ आणि ‘फिझा’ या चित्रपटांचा समावेश आहे. शबानाचं स्क्रीन नाव नेहा होतं. ९०च्या दशकातच मनोज आणि शबाना यांची भेट झाली आणि २००६ मध्ये त्यांचे लग्न झाले. या जोडप्याला एक मुलगी आहे.