हिंदी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमबॅक झाला आहे. ‘जवान’, ‘पठाण’, ‘गदर २’ यांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ या दोन्ही चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ने तर ८०० कोटींची विक्रमी कमाई केली असून ‘सॅम बहादुर’नेही १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला आहे. या बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेचा फटका मात्र इतर छोट्या चित्रपटांना बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ८ डिसेंबर रोजी मनोज बाजपेयी यांचा ‘जोरम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ यांच्यातील बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत ‘जोरम’कडे प्रेक्षकांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं असं मनोज बाजपेयी यांनी मत मांडलं आहे.

‘न्यूज १८’शी संवाद साधताना मनोज म्हणाले, “मी कायमच बॉक्स ऑफिस कमाईच्या वेड्या ध्यासाबद्दल, अट्टहासाच्या विरोधात भाष्य केलं आहे. मला असं वाटतं की या कमाईच्या स्पर्धेमुळे फिल्ममेकिंगचा आत्मा हरवला आहे. प्रेक्षकांच्या तोंडावर कमाईचे आकडे फेकून मारणं हे काही योग्य नाही.” जेव्हा प्रेक्षकसुद्धा बॉक्स ऑफिसवरील कमाईचीच भाषा बोलू लागतात तेव्हा होणाऱ्या त्रासाबद्दलही मनोज यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : साऱ्या बॉलिवूडने अंडरवर्ल्डपुढे तुकवली मान, पण एकट्या प्रीती झिंटाने निडरपणे केलेला ‘डी-गँग’चा सामना

पुढे ते म्हणाले, “संभाषण सुरू असताना लोकसुद्धा चित्रपटांच्या कमाईचे आकडे सांगतात, त्यांना असं वाटतं की एखाद्या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली म्हणजे तो उत्तम चित्रपटच आहे. हा दृष्टिकोनच चित्रपटसृष्टीसाठी फार धोकादायक आहे. या एका गोष्टीमुळे चित्रपटसृष्टीतील कित्येक लोकांच्या कल्पकतेचं, विचारांचं प्रचंड नुकसान केलं आहे.”

मनोज बाजपेयी म्हणतात, “मला माहितीये की ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ हे बिग बजेट चित्रपट आहेत, त्यांच्यावर प्रचंड पैसा निर्मात्यांनी खर्च केला आहे. पण ‘जोरम’सारख्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी तेवढे पैसे खर्च करणं आम्हाला शक्य नाहीये, कारण हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. आम्ही त्याच्या प्रमोशनसाठी ठराविक पैसाच खर्च करू शकतो. आम्हाला चित्रपटावर उगाच दबाव टाकायचा नव्हता, कारण शेवटी त्यातून नफा कमवून द्यायचं खरं कौशल्य हे अभिनेत्याचं असतं.” मनोज बाजपेयी यांच्या ‘जोरम’ला चांगला प्रतिसाद मिळाला असून याचं दिग्दर्शन देवाशीष मखीजा यांनी केलं आहे. याआधी त्यांनी मनोज बाजपेयी यांच्या ‘भोसले’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj bajpayee says joram business affected because of animal and sam bahadur hype and clash avn