हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोजने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका मनोज यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज यांनी त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी यांनी चित्रपटसृष्टीतील नेपोटीजमबद्दल भाष्य केलं आहे. मनोज यांच्या म्हणण्यानुसार नेपोटीजम ही एवढी मोठी समस्या नसून यामागील खरी समस्या वेगळीच आहे. कोविड काळापासून बॉलिवूडमधील नेपोटीजम आणि त्यामुळे इतरांवर होणारा अन्याय या गोष्टीला वाचा फुटली. या मुलाखतीमध्ये मनोज यांनी याबद्दलच भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “फिल्मी सुहाग रात…” स्वरा भास्करने शेअर केलेला मधुचंद्राच्या रात्रीचा खास फोटो चर्चेत
मनोज म्हणतात, “नेपोटीजम ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे. याचा संबंध तुमचे कनेक्शन आणि नातेसंबंध यांच्याशी असतो. जर तुमचे एखाद्याशी चांगले संबंध आहेत तर तुम्हाला त्याच व्यक्तीबरोबर काम करायला जास्त आवडतं. जर एखादी व्यक्ती कोणा अमुक स्टारच्या मुलाला चित्रपटात घेत असेल तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, शेवटी पैसा हा त्या निर्मात्याचा आहे.” याबरोबरच नेपोटीजम ही एवढी मोठी समस्या नसून खरी समस्या वेगळीच असल्याचंही मनोज यांनी सांगितलं आहे.
याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “चित्रपट वितरणामध्ये भरपूर समस्या आहेत. चित्रपट वितरक यासाठी कारणीभूत आहेत आणि ते याबाबतीत बराच भेदभाव करतात. जर तुम्ही स्टारकीडच्या चित्रपटाला १०० स्क्रिन्स देत आहात तर मला किमान २५ स्क्रीन्स तरी मिळायला हव्या. सगळ्या स्क्रीन्स त्यालाच मिळाल्या तर मग माझं कसं होणार?” मनोज बाजपेयी यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीसह ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.