हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. दर्जेदार अभिनयाने मनोजने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका मनोज यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज यांनी त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केलं. लोकांनी ही सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली. आता मनोज हॉटस्टारवर एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यानिमित्तानेच त्यांनी नुकतंच युट्यूबच्या ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये त्यांना राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा : “फर्जी २ नक्की येणार पण…” शाहिद कपूरचा वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनबद्दल खुलासा

याविषयी बोलताना मनोज म्हणाले, “तो हटके माणूस आहे. ‘सत्या’, ‘शिवा’, ‘रंगीला’, ‘शूल’, ‘कंपनी’सारखे चित्रपट देऊन राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटसृष्टीचा चेहेरा मोहराच बदलून टाकला. त्यांनी चित्रपटसृष्टीला कित्येक उत्तम नट आणि सहाय्यक दिग्दर्शक दिले. मला वाटतं की अशी हटके विचार करणारी माणसंच हिंमतवान असतात.” मनोज यांना ‘सत्या’सारख्या चित्रपटातून रातोरात स्टार बनवण्यात राम गोपाल वर्मा यांचा मोठा हात आहे.

याबरोबरच राम गोपाल वर्मा हे सध्या चित्रपट का काढत नाहीत, या प्रश्नावर मनोज उत्तरले, “हा खूप उत्तम प्रश्न आहे. हे तुम्ही त्यांनाच विचारायला हवं. माझ्यामते तो स्वतःच्या मनाचा राजा आहे, त्याला जे योग्य वाटतं तेच तो करतो. तो कायम स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक असणारा दिग्दर्शक आहे. सध्याचं आधुनिक जग आणि नातेसंबंध याबद्दलचे त्याचे विचार हे फार वेगळे आहेत. मी त्या मतांशी पूर्णपणे सहमत नसलो तरी एक दिग्दर्शक म्हणून त्याच्याशी बोलताना फार बरं वाटतं.” मनोज यांचा ‘गुलमोहर’ हा चित्रपट नुकताच हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीसह ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader