हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

मनोज बाजपेयी आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांनी त्यांचा स्ट्रगल एकाच काळात सुरू केला. मनोज हे शाहरुखला दिल्लीत असल्यापासून ओळखतात. नुकतंच मनोज यांनी शाहरुखला मिळालेल्या यशाबद्दल अन् त्याच्या लोकप्रियतेबद्दल भाष्य केलं आहे. सध्या ते दोघे एकमेकांना फारसे भेटत नसले तरी त्यांना एकमेकांप्रति प्रचंड आदर आहे. वयाच्या १९ व्या वर्षांपासून दोघांनी एकत्र काम केलं आहे, त्यामुळे त्यांचे संबंध आजही तितकेच चांगले आहेत.

आणखी वाचा : १०० कोटींचा खर्च, १२००० चाहत्यांची उपस्थिती, पत्नीची कोट्यावधींची साडी; असा पार पडलेला Jr.NTR चा शाही लग्नसोहळा

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज याबद्दल म्हणाले, “त्याने स्वतःभोवती निर्माण केलेलं विश्व आणि त्याला मिळालेलं यश पाहून मला प्रचंड आनंद होतो. वयाच्या २६ व्या वर्षी ज्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आई वडिलांचं छत्र हरवलं होतं, अशा परिस्थितीत त्याने स्वतःचं कुटुंब पुन्हा उभं केलं, स्वतःचं नाव मोठं केलं. त्याच्याबरोबर घडणाऱ्या या गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत त्यामुळे मला त्याच्याबद्दल आदर आहे. माझ्या मनात शाहरुखबद्दल कधीच द्वेष, मत्सर किंवा कटुता निर्माण होणार नाही.”

आणखी वाचा : “सध्या चित्रपटसृष्टी ICU मध्ये…” शाहरुख खानच्या ‘पठाण’चा उल्लेख करत तरण आदर्श यांचं मोठं वक्तव्य

शाहरुख आणि मनोज बाजपेयी यांनी एकत्र फार काम केलेलं नाही. १९८९ साली एका टीव्हीवरील चित्रपटासाठी त्यांनी काम केलं त्यानंतर थेट २००४ मध्ये ‘वीर-जारा’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं. सध्या मनोज बाजपेयी त्यांच्या ‘एक बंदा काफी है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याबरोबरच त्यांच्या ‘द फॅमिलीमॅन’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader