बॉलीवूड अभिनेते मनोज कुमार(Manoj Kumar) यांचे ४ एप्रिल २०२५ ला शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. आज ५ एप्रिल २०२५ ला त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील पवन हंस स्मशान घाटावर मनोज कुमार यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले होते. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. मनोज कुमार यांची पत्नी शशी गोस्वामी यांचे अश्रू थांबत नसल्याचे काही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मनोज कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सोशल मीडियावर मनोज कुमार यांच्या पत्नी शशी गोस्वामी यांचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये त्या अत्यंत रडत असल्याचे दिसत आहे. एका बाजूने त्यांना त्यांच्या मुलाने धरले असून शशी गोस्वामी यांच्या हातात मनोज कुमार यांच्या पार्थिवाला घालण्यासाठी एक फुलांचा हार दिल्याचे पाहायला मिळत आहे. पती मनोज कुमार यांना अखेरचा निरोप देताना त्यांना अत्यंत दु:ख झाले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचा मुलगादेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मनोज कुमार यांचे बॉलीवूडमधील योगदान मोठे आहे. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही केले आहे. देशभक्तिपर आधारित त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले, त्यामुळे त्यांना भारत कुमार असे संबोधले जात असे. नील कमल, रोटी कपडा और मकान, पूरब और पश्चिम, क्रांती अशा अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला. अशा चित्रपटांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. जवळजवळ ५० वर्षे त्यांनी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारांसाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलीम खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सुभाष घई, प्रेम चोप्रा असे अनेक कलाकार मनोज कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. मनोज कुमार यांच्याबद्दल सुभाष घई म्हणाले, “ते आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी त्यांच्या चित्रपटातून देशभक्ती लोकांपर्यंत पोहोचवली आणि लोकांना हे सांगितले की, भारत काय आहे आणि कसा असायला हवा.”

राजपाल यादव म्हणाले, “मनोज कुमार हे मनोरंजन विश्वातील रत्न आहेत. मी त्यांना अभिवादन करतो.” गायक अनु मलिक म्हणाले, “त्यांनी जे चित्रपट बनवले, ते समाजाच्या भल्यासाठी बनवले. असे लोक परत-परत या जगात येत नाहीत. आपण सर्वांनी मनोज कुमार साहेबांच्या चित्रपट, गाणी आणि दिग्दर्शनातून प्रेरणा घेतली पाहिजे.”

प्रेम चोप्रा म्हणाले, “आम्ही सुरुवातीपासूनच बरोबर होतो. आमचा प्रवास सुंदर होता. त्यांच्याबरोबर काम करून सगळ्यांना फायदा झाला. मलादेखील त्यांच्याकडून खूप काही मिळाले. ते माझे चांगले मित्र होते,” असे म्हणत कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.