Actor Manoj Kumar Died at 87 : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांचं आज म्हणजेच शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झालं. मनोज कुमार यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनोज कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मनोज कुमार यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांनी “महान अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे, त्यांच्या कामांमुळे राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत झाली, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमच प्रेरणा असतील; या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंब आणि चाहत्यांबरोबर आहे, ओम शांती.” असं म्हटलं आहे.

मनोज कुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी आहे. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये झाला. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात स्थायिक झाले. दिल्लीमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले. हरिकिशन (मनोज कुमार) यांनी दिलीप कुमार अभिनीत ‘शबनम’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती.

दिवंगत अभिनेते मनोज कुमार

चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या भूमिकेचे नाव मनोज कुमार होते. हरिकिशन (मनोज कुमार) त्यांच्या भूमिकेने खूप प्रभावित झाले. त्यावेळी पीटीआयला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, “मी तेव्हा ११ वर्षांचा असेन, पण मी लगेचच ठरवले की, जर मी कधी अभिनेता झालो तर माझे नाव मनोज कुमार असेच ठेवेन” आणि अशाप्रकारे १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात हरिकिशन गिरी गोस्वामी मनोज कुमार झाले.

मनोज कुमार यांची चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. ‘फॅशन’ या चित्रपटातून १९५७ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिथपासून पुढची ३८ वर्षे म्हणजे जवळपास चार दशकं ते काम करत होते. १९९५ मध्ये आलेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांची देशभक्तिपर गीतं आजही लोकप्रिय आहेत. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा असा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

दरम्यान, मनोज कुमार यांच्या पार्थिवावार शनिवारी (५ एप्रिल) रोजी मुंबईतील विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांच्या कुटुंबातील काही सदस्य परदेशात राहतात, त्यामुळे कुटुंबाने शनिवारी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन रुग्णालयात ठेवण्यात येईल. शनिवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील घरी नेले जाईल.