ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.
या संपूर्ण वादावर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रियाही दिली. आत्ताच्या पिढीला हे संवाद कनेक्ट व्हावेत यासाठी ते जाणूनबुजून लिहिण्यात आल्याचं मनोज यांनी स्पष्ट केलं. यानंतर चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीने नुकतंच पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा शेअर करणारी पोस्ट केली. ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटी कामावल्याचं या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ला होणाऱ्या विरोधात आणखी वाढ; रावणाच्या मांस खाऊ घालण्याचा सीन पाहून प्रेक्षक भडकले
मनोज मुंतशीर यांनीही ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली. “आभार मेरे देश.. जय श्रीराम” असं लिहीत त्यांनी हा फोटो शेअर केला. या पोस्टखाली बहुतेक सगळ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. लोकांनी मनोज मुंतशीर यांच्या या पोस्टखाली कॉमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “हिंदू लोकांच्या आस्थेला धक्का लावून सेलिब्रेशन कसलं करता?” असा प्रश्न एका युझरने केला आहे.
तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, “थोडीतरी लाज बाळगा.” आणखी एका युझरने लिहिलं की “हा तर निर्लज्जपणाचा कळस, संपूर्ण देश तुम्हाला घाणेरड्या डायलॉगसाठी शिव्या घालत आहे.” मनोज यांची ओळख राष्ट्रवादी विचारधारेचे लेखक अशी आहे, आणि आता या चित्रपटामुळे त्यांच्याच प्रतिमेला धक्का लागल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत.