विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला होता, ते दृश्य दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते.
औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरात आहे. ही कबर हटवण्याची मागणी होत आहे. याच दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याबाबत लेखक व गीतकार मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
‘छावा’ रिलीज झाल्यानंतर सुरू झालेल्या औरंगजेबाच्या थडग्यासंदर्भातील वादावर मनोज मुंतशिर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनोज मुंतशिर म्हणाले, “महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधलेली औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पण मी या मागणीच्या विरोधात आहे. औरंगजेबाची कबर हटवू नये. कधीच नाही.”
कबर का हटवू नये, याबद्दल मनोज मुंतशिर म्हणाले, “जेव्हा आम्ही हिंदू श्रीराम जन्मभूमीची लढाई कोर्टात लढत होतो, तेव्हा या शांतीप्रिय समाजातील काही लोक आम्हाला म्हणत होते की देव सगळीकडेच आहे, त्यामुळे श्रीराम मंदिर बांधण्याची काय गरज आहे? या जमिनीवर रुग्णालय, शाळा किंवा अनाथ आश्रम बांधा. मी भारत सरकारला विनंती करतो. औरंगजेबाची कबर हटवायची काय गरज आहे? त्याच्यावरती शौचालय बांधा. आम्ही सनातनी त्याला युरिया आणि मीठ दान करूच शकतो.”
पाहा व्हिडीओ –
“या व्हिडीओवर जे धर्मनिरपेक्ष लोक ‘किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है’ अशा कमेंट्स करणार आहेत, त्यांना मी अतिशय नम्रतेने सांगतो की..
नसों मे सूर्यवंशी स्वाभिमान था और है
सनातन से ही भगवा आसमान था और है
शिवाजी और राणा को पिता कहते है हम अपना
हमारे बाप का हिंदुस्थान था और है”, असं मनोज मुंतशीर म्हणाले.
औरंगजेबाची कबर पाडण्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतेय, त्याबद्दल आपल्यालाही असं वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले. “आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं (ASI) संरक्षण मिळालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.