‘यशराज स्पाय युनिव्हर्स’मधील पाचवा चित्रपट ‘टायगर ३’ सलमान खान दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दिवाळीसारखा सण असूनही या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली आहे. तथापि, सोमवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने सर्वाधिक कलेक्शन म्हणजेच ५९.२५ कोटी रुपये इतके कमावले. हळूहळू या चित्रपटाची कमाई कमी झाली अन् पाचव्या दिवशी त्याने केवळ १८ कोटींचीच कमाई केली.
या चित्रपटाच्या कमाईत पाचव्याच दिवशी घसरण दिसू लागल्याने बरेचसे चित्रपटगृहांचे मालक चिंतेत आहेत. मुंबईचे प्रसिद्ध मराठी मंदिर व ‘गेटी ७’ या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनीदेखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘टायगर ३’च्या कलेक्शनचे आकडे पाहता ते फारच निराश झाले आहेत. या चित्रपटाकडून बऱ्याच लोकांना खूप अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवरील आकडे पाहता त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत असंच चित्र दिसत आहे.
आणखी वाचा : १९ वर्षांनी आरोप करणाऱ्या अमित सानाला पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचं चोख उत्तर; म्हणाला, “तो फार…”
‘फिल्मी फिव्हर’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठा मंदिर व जी ७ या मुंबईतील दोन प्रसिद्ध चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “माझ्या या चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या, शोज हाऊसफूल न गेल्याने मी खूप निराश झालो आहे. सुपर डूपर हीट असा हा चित्रपट नक्कीच नाही.” असं थेट मत मांडून हा चित्रपट फारसा प्रेक्षक खेचणारा नाही असा निकाल मनोज देसाई यांनी दिला आहे.
‘टायगर ३ʼने पहिल्या तीन दिवसांत या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवान, पठाण आणि गदर २ या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. चौथ्या व पाचव्या दिवशी जरी चित्रपटाच्या कमाईत घट नोंदवण्यात आली, तरी आठवड्याच्या शेवटी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात हा चित्रपट ३०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाशमी, रेवती, कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.