Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमावर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. १४ फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला आहे. तर, अनेकांनी व्हिडीओ, पोस्ट शेअर करत ‘छावा’बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, सिद्धार्थ चांदेकर, नेहा शितोळे या कलाकारांपाठोपाठ अभिनेता अभिजीत चव्हाणने पोस्ट लिहित ‘छावा’चं भरभरून कौतुक केलं आहे. महाराजांचा इतिहास, त्यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर आणल्यामुळे या पोस्टमध्ये अभिजीतने विशेषत: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचे आभार मानले आहेत. संपूर्ण सिनेमा अद्भूत आहे मात्र, ‘छावा’मध्ये अभिजीत चव्हाणला फक्त एकच कमी भासलीये, यावर नेटकऱ्यांनी सुद्धा सहमती दर्शवली आहे. याबाबत जाणून घेऊयात…
अभिजीत चव्हाण लिहितो, “मध्यरात्री चित्रपट संपला… ‘छावा’ कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते तशाच अवस्थेत बाहेर पडलो. गाडी काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. खूप दुर्मिळ क्षण असतात हे… या क्षणांसाठी लक्ष्मण उतेकर सर तुमचा मी आभारी आहे. मराठ्यांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला, जाणूनबुजून बदलला गेला, त्यात शंभूराजांसारखे खरे धर्मवीर होरपळले गेले. तो इतिहास तितक्याच भव्यतेने सर तुम्ही रजतपटावर आणून आम्हाला उपकृत केलंत. मी समीक्षक नाही पण जे भिडलं ते आणि तसंच लिहितोय.”
“विकी कौशलने छावा साकारताना प्राण ओतले आहेत. तिच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब साकारताना… निशब्द…! ए आर रहमानचं संगीत सोडल्यास चित्रपटाने कहर केलाय… माझ्या लाडक्या संत्याचं म्हणजेच संतोष जुवेकरचं काम त्याच्यासारखंच देखणं… यांची दृश्य बघताना अक्षरशः चेव चढतो नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात, दात ओठ चावले जातात… इतका जबरदस्त परिणाम साधतो चित्रपट… सगळ्या टीमचे आभार आम्हाला संपूर्ण अनुभव देण्यासाठी… चित्रपट सगळे रेकॉर्डस् मोडेल यात शंकाच नाही. आवर्जून बघा, ओटीटीवर येण्याची वाट बघू नका चित्रपटगृहात जाऊन बघा आणि संगरात न्हाऊन जा… जय शिवराय. हर हर महादेव!” असं अभिजीत चव्हाणने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अभिजीत चव्हाणची पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “सर बरोबर आहे ए आर रेहमान यांच्याऐवजी अजय-अतुल यांनी जास्त न्याय दिला असता” अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.