‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. तब्बल ४ वर्षांनी कमबॅक केल्यावर शाहरुख खानचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते किरण माने यांनी किंग खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण मानेंनी नुकताच शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्याचं कथानक, सध्याची समाजिक परिस्थिती आणि किंग खानची लोकप्रियता यावर त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी शाहरुख आणि त्याच्या ‘जवान’चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.
किरण माने यांची पोस्ट
…हरीवंशराय बच्चन रोज रात्री झोपायच्या आधी व्हिसीआर वर बच्चनसायबांचा कुठलातरी एक पिच्चर बघून मग झोपायचे. खरंतर हरीवंशराय बच्चन हे अभिजात कवी. ‘मधुशाला’ सारख्या क्लासिकची भारतातील महान काव्यामध्ये गणना होते. अमिताभला वाटायचे, ‘आपले पिच्चर तद्दन मसाला. ‘लॉजिक बिजिक’ गुंडाळून ठेवून पिटातल्या पब्लीकसाठी बनवलेले. आपल्या बुद्धीवादी बाबूजींना त्यात काय आवडत असेल?’ त्यावर हरीवंशरायजींनी जे उत्तर दिलं, ते लै भारी होतं. ते म्हन्ले, “बेटा, आपली बहुतांश जनता गोरगरीब आहे. महागाई, बेरोजगारीनं त्रासलेली आहे. कामावर मालकही शोषण करतो. त्यांना मनोमन वाटतं बंड करुन उठावं. तू तीन तासापुरता अशा भारतीयांचा ‘मसीहा’ बनतोस. त्यांना ‘पोएटिक जस्टिस’ मिळवुन देतोस! ते या समाधानात थिएटरबाहेर पडतात की ‘आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शेवटी सत्य आणि प्रामाणिकपणा जिंकतो. दुष्टांचा खातमा होतो.’
…आजच्या भवतालात अशा ‘मसीहा’ची गरजय. बच्चनही ‘बच्चन’ राहिला नाही. ती कमी शाहरूखनं भरुन काढली. सर्वसामान्य प्रेक्षकांना जातपात, धर्म वगैरेंशी काहीही घेणंदेणं नाय. त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत पडलीय. तीस-चाळीस हजारांच्या कर्जाच्या ओझ्यानं दबून शेतकरी आत्महत्या करतात, तर दूसरीकडं बड्या उद्योगपतींचं चाळीस हजार कोटींचं कर्ज माफ होतं. सरकारी हॉस्पिटल्समध्ये सुविधांच्या अभावापोटी असंख्य चिमुरड्यांपास्नं वयोवृद्धांपर्यन्त किड्यामुंगीसारखे मरतायत. महागाई, बेरोजगारी वाढतच चाललीय. बॉर्डरवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या हातातही अतिशय निकृष्ट दर्जाच्या रायफली असतात. नवनविन सरकारं आपण निवडून देतो, पन निवडणुकांमध्ये जी आश्वासनं दिली जातात, त्यांना नंतर हरताळ फासला जातो.
…अशा परिस्थितीत ‘जवान’नं सगळ्या भारतीयांच्या मनोरंजनासोबतच, मनात खदखदत असणार्या गोष्टींना वाचा फोडली आहे… खर्या समस्या सोडवून ‘न्याय’ पण मिळवून दिला आहे. सिनेमात का होईना ‘काला धन’ परत मिळवून गोरगरीबांच्या खात्यात जमा करण्यापास्नं लोकप्रतिनिधी, मंत्र्यासंत्र्यांना गुडघ्यावर आणून अत्यावश्यक सेवांबद्दल जाब विचारण्यापर्यन्त सगळं-सग्ग्गळं केलं त्यानं.
पूर्वीच्या काळी अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेलेत. पण आज हे मांडणं लै लै लै धाडसाचं आणि गरजेचं आहे. त्याकाळात मुभा होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांची जपणूक होती. ‘बायकॉट ट्रेंड’ नव्हता. त्यामुळं आज ‘खर्याखुर्या’ विषयावर परखडपणे बोलून वास्तवाचं भान देणार्या मनोरंजक फॅंटसीची लै लै लै गरज होती. प्रेक्षकांनी अक्षरश: दिवाळी-दसरा असल्यागत ही गोष्ट साजरी केली.
मनोरंजन करण्याबरोबर समाजभान असणारे कलावंत आज दुर्मिळ झाले आहेत. व्यवस्थेपुढं लोटांगण घालणार्या पायचाटू, लाळघोट्या सुमार कलावंतांची सद्दी आहे. या काळात पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळ्यांत अंगार घेवून, फूल्ल ऑफ स्वॅगनं शाहरूख आलाय….
लै दिसांनी थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या,शिट्ट्यांचा छप्परतोड दनका अनुभवला. लै दिसांनी “बेटे को हाथ लगाने से पहले…” सारख्या डायलॉगला प्रेक्षकांनी जल्लोष केलेला पाहिला. लै दिसांनी आमचा खराखुरा ‘हिरो’ आम्हाला दिसला !
आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो. बाहेर पडतानाबी लोकांना घरी जायची घाई नव्हती. मन भरलं नव्हतं. जाता-जाताबी शाहरूखच्या पोस्टर समोर सेल्फी काढायला रांग लागली होती. मी बी त्यात सामील झालो… कारण आम्हा सर्वांना तीन तासात ‘पोएटिक जस्टीस’ मिळाला होता !
लब्यू ॲटली…आणि शारख्या, तुला घट्ट घट्ट मिठी !
किरण माने
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथ सुपरस्टार्सची तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच मराठमोळ्या गिरिजा ओकने सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.