मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता पुष्कर जोगला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमामुळे त्याला नवीन ओळख मिळाली. नुकतंच पुष्करने एका मुलाखतीत त्याच्या वडिलांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी तो भावूक झाला.
पुष्कर जोगने नुकतंच अभिनेत्री सुरेखा तळवळकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचे वडील सुहास जोग यांच्याबद्दल भाष्य केले. त्यावेळी त्याने त्यांच्या गोड आठवणी ताज्या केल्या.
आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा
“मला माझ्या बाबांची कायमच आठवण येते. मी त्यांच्याबद्दल जेव्हा कधी काही बोलतो, तेव्हा माझ्या डोळ्यात आपोआप पाणी तरळतं. त्यांचा सपोर्ट मला होता आणि आजही तो आहे. त्यांची शिकवण, संस्कार या सर्व गोष्टी आजही मी पाळतो. पुण्यात त्यांचं मोठं नाव होतं. त्यांनी तीन ते चार लाख मुलांना शिकवलं. पण इतकं असूनही पाय कसे जमिनीवर ठेवायचे, हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं”, असे पुष्करने म्हटले.
“त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी मला एक सल्ला दिला होता. “तू अभिनेता म्हणून १९-२० असला तरी चालेल, पण माणूस म्हणून तू नेहमीच उजवा असायला हवं.” ती शिकवण मला आजही आहे. मला त्यांची आजही आठवण येते. त्यांनी मला कायमच पाठिंबा दिला, त्यांचे आशीवार्द सदैव आमच्या पाठीशी आहेत”, असेही त्याने सांगितले.
आणखी वाचा : Video : काजोल आणि अजयची लेक निसाचं वय नेमकं किती? वाढदिवसाचा केक पाहून नेटकरी म्हणाले “ती २५-२६ वर्षांची…”
“पण त्यांचं निधन फार लवकर झालं. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. ते ५२ वर्षाचे असतानाच हे जग सोडून गेले. त्यावेळी मी फक्त २२ वर्षांचा होतो. त्यामुळे मला प्रेक्षकांना सांगायचं की तुम्ही आयुष्यात काहीही करा, पण आई-वडिलांना दुखवू नका. त्यांना भरपूर आनंद द्या. कारण त्यांच्या इतकं प्रेम तुमच्यावर कोणीही करत नाही. कारण ज्यांना वडील नाहीत, त्यांना या गोष्टी सतत जाणवतात”, असा सल्ला पुष्कर जोगने त्याच्या चाहत्यांना दिला.