Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला गेल्या बारा दिवसांत बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. विकीसह या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे असे सगळेच कलाकार चित्रपटात शेवटच्या सीनपर्यंत लक्ष वेधून घेतात.
‘छावा’मध्ये सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशी यांनी अनुक्रमे गणोजी आणि कान्होजी या भूमिका साकारल्या आहेत. सारंग पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत झळकला असल्याचं त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून कैद केलं जातं असा अंगावर शहारा आणणारा सीन आहे. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच पुढे फितुरी झाल्याचं उघड होतं. याच भूमिका सारंग आणि सुव्रत यांनी साकारल्या आहेत.
गणोजींच्या भूमिकाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला असा प्रश्न सारंग साठ्येला एनडीटीव्हीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “गणोजींची भूमिका पाहून मला मारायला निघालेत प्रेक्षक… त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबद्दल काही बोलणार नाही. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे कारण, ती साधी गोष्ट नाहीये. स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्ट त्या पात्राने केली होती. त्यामुळे अर्थातच त्यांचा रोष स्वीकारायला मी तयार आहे.”
“पण, याचबरोबर मी एक गोष्ट सांगतो की, लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट यासाठी केलं होतं कारण, त्यांचं असं म्हणणं होतं दोन असे कलाकार ज्यांनी याआधी फार गोड कामं केली आहेत, त्यांनी याआधी कधीही निगेटिव्ह भूमिका केलेली नाही, अशा दोन कलाकारांनी जर ही भूमिका केली तर, लोक कदाचित अंदाज बांधू शकणार नाहीत की, हे दोघं पुढे जाऊन असं काहीतरी करतील. मग, ते लोकांच्या पण आणखी जिव्हारी लागेल. त्यामुळेच आमचं कास्टिंग झालं होतं. आमच्या मनात खूप खूप धकधक होती पण, लक्ष्मण सरांना माहिती होतं हे वर्क होईल त्यामुळे यामागचं सगळं क्रेडिट त्यांचं आहे.” असं सारंग साठ्येने सांगितलं.
दरम्यान, ‘छावा’ सिनेमाने भारतात रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे. अवघ्या १२ दिवसांत सिनेमाचं ३७२.८४ कोटींचं कलेक्शन झालं आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.