करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. मात्र या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने यावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘तुम क्या मिले…’ या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात रणवीर-आलियाची जबरदस्त डान्स केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मात्र या गाण्यावरुन चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे.
आणखी वाचा : आधी पुण्यात घर, आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस; प्राजक्ता माळीचे स्वप्न झाले साकार
नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने व्हॉट झुमका? का? कोणाकोणाचं डोकं? अशी तिने यात म्हटले आहे. त्याबरोबर तिने दोन इमोजीही पोस्ट केले आहे. गौतमीने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे तिला हे गाणं अजिबात आवडलेलं नाही, हे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान ‘व्हॉट झुमका’ हे गाणं “झुमका गिरा रे…” या मूळ गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन आहे. याचे मूळ गाणे १९६६ मध्ये ५७ वर्षांपूर्वी रिलीज झाले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी या गाण्याला रिक्रिएट करण्यात आले आहे. हे गाणे अरिजित सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. परंतु, ‘झुमका’ गाण्याचे रिक्रिएशन प्रेक्षकांना अजिबातच आवडलेले नाही.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.