Kranti Redkar Reaction On Chhaava Movie: सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. १३० कोटींचं बजेट असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने भारतात आतापर्यंत १२१ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या ‘छावा’ चित्रपटाची जोरदार घोडदौड पाहायला मिळत आहे. इतर कलाकार मंडळी सोशल मीडियावरद्वारे या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देत, चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. तसंच विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर अशा चित्रपटातील सर्व कलाकारांचं कौतुक केलं आहे. क्रांती रेडकर म्हणाली, “माझे डोळे आताही सुजलेले दिसतायत. मी काल ‘छावा’ हा चित्रपट बघून आलीये. हा चित्रपट समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणीव करून देतो की, तुम्ही समाजात कुठे उभे राहत आहात? माझी अशी इच्छा आहे, तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल, हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. हा एक खूप वेगळा अनुभव आहे.”

पुढे क्रांती रेडकर म्हणाली की, मला असं वाटतं की, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने जे काम केलं आहे, ते इतकं स्तुत्य आहे. इतकं सुंदर आहे. ते महाराज होते, ते राजे होतेच. ते बघताना आपल्या अंगावर शहारा येत असतो. त्यांची प्रत्येक हालचाल, त्यांची प्रत्येक नजर, त्यांची देहबोली, त्यांनी ज्या प्रकारे चित्रपट डब केलाय, मला वाटतं, तो मास्टर क्लास आहे. प्रत्येक नटासाठी सुद्धा. तसंच रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर बाकीच्या आपल्या सगळ्या मराठी कलाकारांनी जी साथ दिलीये, त्याच बरोबर सिनेमॅटोग्राफी, मेकेअप डिपार्टमेंटला तर साष्टांग दंडवत आहे.

“लक्ष्मण उतेकर तुमचं विशेष कौतुक. कारण तुम्ही एवढ्या धाडसी विषयाला हात घातला आणि तुम्ही इतक्या लीलया पार पडला. इतकं अप्रतिम सादरीकरण झालं. बऱ्याच वेळेला असं होतं की, सत्यघटनेवर काहीतरी करत असताना त्यातली भावना राहिली जाऊ शकते. ही सतत भीती सारखी असते. पण, तुम्ही एका क्षणालासुद्धा त्या भावना विसरलात नाहीत. एका आई-मुलांमधलं नातं असो, नवरा-बायकोमधलं नातं असू दे किंवा एका हिरो-खलनायक, ही प्रत्येक भावना तुम्ही जपली. या चित्रपटाचे शेवटची २५ मिनिटं जी आहेत, हे तुम्हाला असं जाणीव करून देत की, माणूस म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही कसे जगताय? म्हणजे आपण चालताना जरी कोणाचा धक्का लागला तरी चिडणारे आपण किंवा बॉस बोलला म्हणून चिडणारे आपण, एवढ्याशा गोष्टींनी आपल्याला चिडायला होतं असेल. तर महाराजांनी जे आपल्यासाठी केलं, ज्या यातना, अपमान फक्त स्वराज्यासाठी भोगले. त्या २५ मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा,” अशी क्रांती रेडकर म्हणाली.

दरम्यान, मॅडॉक निर्मित ‘छावा’ चित्रपटात दिव्या दत्त, विनीत कुमार सिंह, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटींहून अधिक कमाई केली होती.