झी मराठी वाहिनीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिसने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेतील शमिका आणि अभिजीतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि मालिकेला खूप प्रेम मिळालं. नंतर ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.
मृणालने त्यानंतर लग्न केलं आणि तिच्या पतीसह ती अमेरिकेला राहायला गेली. चार वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर मृणाल आता भारतात परतलीयं. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर मृणालला मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायचंय; अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. कलाकारांनी आधी केलेल्या भूमिकांप्रमाणेच ते असतात, अशी छाप लोकांच्या मनावर पडलेली असते. पण, कलाकार अष्टपैलू असतात आणि ते कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या करू शकतात. अगदी सोज्वळ, साध्या भूमिकेत आजवर दाखवली गेलेली मृणाल बोल्ड सीनपण करू शकते हे लोकांना पटतंच नाही. यावर नुकतीच ती एका मुलाखतीत बोलली आहे.
नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “मला ना लोकं ओळखतंच नाहीत. तुम्ही एखादं पात्र करता ना, तर त्यांना असं वाटतं की ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार आहे असं नाही, पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट सभ्यतेने दाखवणं सोप्प असतं आणि ते जमतं आणि ते जमायला पाहिजे. तसं जर काही सभ्यतेने दाखवलं जाणार असेल आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही, जर तुम्ही एक अभिनेता/अभिनेत्री आहात.”
मृणाल पुढे म्हणाली, “काही बंधनं आणि शिस्त नक्कीच तुमच्या कामात आणि तुमच्या वागण्या बोलण्यात असायलाच पाहिजेत आणि मला वाटतं तेवढी स्ट्रिक्ट मी आहेच. जे मला वाटतं की सभ्यतेने जाईल आणि जे अगदीच खूपच गरजेचं आहे आणि ते करायलाच हवय, मग मला काही आक्षेप नाहीय. पण, म्हणून उगाचच काहीतरी करायचंय आणि तर मग मीपण तेवढी कम्फर्टेबल नसते. मला नाही म्हणायला काही प्रॉब्लेम नसतो.”
हेही वाचा… “मी माझ्या बायकोला घाबरतो तर…”, किंग खान शाहरुखला वाटते पत्नी गौरीची भीती? अभिनेता म्हणाला होता…
दरम्यान, मृणाल दुसानिस तिच्या कुटुंबासह भारतात परतली आहे. मृणालच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर मृणालने २०१६ रोजी नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नीरज आणि तिचं अरेंज मॅरेज झालं होतं. २४ मार्च २०२२ रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे.