Chhaava Movie : सध्या बॉलीवूडसह मराठी कलाविश्वात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘छावा’ चित्रपटाला पहिल्या शो पासूनच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे.
सध्या सगळेजण ‘छावा’ पाहिल्यावरचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुद्धा हा सिनेमा नुकताच पाहिला. चित्रपट पाहिल्यावर प्राजक्ताने टीमचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने दिग्दर्शक व निर्मात्यांचे आवर्जून आभार मानले आहेत.
“छत्रपती संभाजी महाराज की जय! मराठ्यांच्या राजाची, मराठी बाण्याची, सिंहाच्या छाव्याची गोष्ट जगभरात पोहोचवली त्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, दिनेश विजन आणि ‘मॅडडॉक फिल्म’चे मनापासून आभार… काल ‘छावा’ चित्रपट पाहिला… अश्रू अनावर झाले, चित्रपट नक्की बघा.” असं प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी कलाकारांनी पाहिला ‘छावा’
प्राजक्ताप्रमाणे सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, नेहा शितोळे यांनीही पोस्ट शेअर करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विकीचंही कौतुक केलंय. ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर सुद्धा दमदार कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने अवघ्या दोन दिवसांत जवळपास ६९ कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘छावा’च्या कलेक्शनची आकडेवारी पाहता हा सिनेमा पहिल्या तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याची दाट शक्यता आहे. कारण, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ‘छावा’चे शो हाऊसफुल्ल आहेत.

दरम्यान, ‘छावा’ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नीलकांती पाटेकर, संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर, मनोज कोल्हटकर, आस्ताद काळे या मराठी कलाकारांनी सिनेमात साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.