Chhaava Movie : विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. मराठीसह बॉलीवूड मनोरंजन विश्वातील कलाकारमंडळी सध्या या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘छावा’चे थिएटरमध्ये हाऊसफुल शो सुरू आहेत. क्लायमॅक्सला सिनेमागृहांमध्ये प्रचंड भावनिक वातावरण निर्माण होत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळत आहे. याशिवाय सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा तुफान कमाई करत आहे.

‘छावा’ने पहिल्या सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल २०३.६८ कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला आहे. प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी अनेक ठिकाणी पहाटे ६ वाजताच्या शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई-पुण्यात हा सिनेमा सर्वाधिक कमाई करत आहे. अनेक लोक ‘छावा’चं कौतुक करत असताना सध्या एका मराठी अभिनेत्रीने या सिनेमामबद्दल लिहिलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.

‘३६ गुणी जोडी’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांमधून घरघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षता आपटेने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यावर लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सिनेमात खटकलेल्या गोष्टी सोशल मीडियावर स्पष्टपणे मांडल्या आहेत.

मराठी अभिनेत्रीची पोस्ट…

‘छावा’बद्दल सांगायचं झालं तर…
हा सिनेमा एकदा पाहू शकतो असा आहे.
जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवलंय.
पहिला भाग ( मध्यांतराच्या आधी ) – ….
दुसरा भाग ( मध्यांतरानंतर ) – फायर इमोजी
सिनेमॅटोग्राफी –
स्क्रिप्ट – X
चित्रपटाचं संगीत – Big Nooo ( मध्यांतराच्या आधीचं बॅकग्राऊंड म्युझिक अजिबात चांगलं नाहीये )
दिग्दर्शन – ✓ & X
वेशभूषा आणि केसांचा मेकअप – ✓✓✓
विकी कौशल – ✓✓✓ ( लव्ह इमोजी वापरले आहेत )
अक्षय खन्ना – ✓✓✓✓✓✓
रश्मिका मंदाना – XXXXXXX
सहाय्यक कलाकार – ✓✓✓

एकंदर मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायची अपेक्षा होती. अन्य प्रेक्षकांप्रमाणे मलाही शेवटचा क्षण पाहून प्रचंड रडू आलं पण, चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. तर, आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवाने, सिनेमात रश्मिकाचा तोच अ‍ॅक्सेंट ऐकायला मिळतो, तिची अभिनय शैली तशीच दिसते जी आपण तिच्या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये पाहिलीये. यामुळेच तिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं अजिबातच जमत नाही. विकीने या चित्रपटात उत्तम काम केलं आहे, त्याला या रुपात आपण यापूर्वी पाहिलेलं नाहीये. पण, स्क्रिप्टमध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर त्याला आणखी छटा दाखविण्याची संधी मिळाली असती.

खूप कमी संवाद मराठीमध्ये ठेवलेत राव… त्यांनी हा सिनेमा मराठीमध्ये सुद्धा का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं…

marathi actress
मराठी अभिनेत्रीची ‘छावा’साठी पोस्ट

अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्री अक्षता आपटेने ‘छावा’बद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. दरम्यान, सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर रश्मिका आणि विकीसह यामध्ये अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम, संतोष जुवेकर, प्रदीप रावत या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे.