अभिनयाबरोबरच कविता, सूत्रसंचालन यामधून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम करून आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह तिने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा जोरदार सुरू आहे. अशातच तिने चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे.
लवकरच अभिनेत्री स्पृहा जोशीचा नवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सब मोह माया है’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्पृहाने या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. “बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौद फॉर मिश्रा परिवार”, असं कॅप्शन लिहीत तिनं नव्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज आज अडकणार लग्नाच्या बेडीत; हळदी समारंभाचे फोटो आले समोर
‘सब मोह माया है’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सरकारी नोकरीसाठी वडिलांच्या मृत्यूचं नाटक कशाप्रकारे रचलं जातं? हे पाहायला मिळत आहे. यामध्ये स्पृहाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बॉलीवूड अभिनेता शर्मन जोशीच्या पत्नीच्या भूमिकेत ती पाहायला मिळणार आहे. शिवाय ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर या चित्रपटात शर्मनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, स्पृहाने यापूर्वी ‘क्लास ऑफ ८३’ आणि ‘अटकन चटकन’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ती ‘रंगबाज’ आणि ‘द ऑफिस’ या हिंदी सीरिजमध्येही झळकली होती.