काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, बॉलीवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे प्रणितवर हल्ला केला गेला. याबाबत प्रणितच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. त्यानंतर आता प्रणित मोरेने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ फेब्रुवारी संध्याकाळी ५.४५ वाजता प्रणित मोरेवर ११ ते १२ जणांनी हल्ला केला. यामधील एक जण प्रणितला धमकावत म्हणाला, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा”. त्यानंतर वीर पहारियाने प्रणित मोरेवरील हल्ल्याची दखल घेत, लगेच सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली. तसंच या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचं, त्याने स्पष्ट केलं. शिवाय हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असं वीर पहारियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. २ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर प्रणित मोरेने पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये प्रणित मोरे म्हणाला, “नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांचे आभार. ज्या लोकांनी माझ्या प्रकृतीबाबत विचारणा केली, प्रार्थना केली. बऱ्याच लोकांनी माझ्यावर झालेल्या हल्ल्याची स्टोरी शेअर केली. ज्यामुळे माझ्यावर झालेला हल्ला अधिक लोकांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी पाच लोकांना अटक केली आहे. हे चांगलंच काम झालं आहे. पण, अजूनपर्यंत कोणाला अटक केलीये याची माहिती देण्यात आलेली नाही. जो मुख्य आरोपी आहे, तो अजूनही फरार आहे. ज्यांनी ही गोष्ट केलीये त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ही मागणी आम्ही सतत करत आहोत. जेणेकरून पुढे भाषण स्वातंत्र्य करताना किंवा कोणताही व्यक्ती विनोद करत असेल तर त्याला जाऊन मारू शकतो, असा विचार केला नाही पाहिजे.”

“सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे सीसीटीव्ही फुटेज आहे, ते पोलिसांनी घेतले आहेत. त्यामुळे आम्ही मागील सहा दिवसांपासून सतत पाठपुरावा घेत आहोत. जे काही बोललं जात आहे. हे खरंच घडलं होतं का? हे कोणी केलं? हे सर्वकाही स्पष्ट होईल. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे सर्वकाही दिसत आहे. याप्रकरणात कोण-कोण लोक होते? त्यामुळे समजलेच. त्या लोकांनी काय-काय केलं आहे? जशी माझी शेवटची पोस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली होती, तसाचा हा व्हिडीओ देखील पोहोचला जाईल. लवकरात लवकर कारवाई होईल आणि त्यामुळे समजले की, याप्रकरणात नेमका कोणाचा हात होता?” असं प्रणित मोरे म्हणाला.

वीर पहारियाबद्दल थोडक्यात माहिती

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा वीर आहे. अलीकडेच त्याचा पहिला चित्रपट ‘स्काय फोर्स’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीरने अक्षय कुमारसह प्रमुख भूमिका साकारली आहे. यावरूनच प्रणित मोरेने विनोद केला होता आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला.