सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून फिरतोय आणि अभिनेता अजय देवगणसाठी भीक मागत आहे. अजय देवगणच्या एका ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीमुळे संतापलेल्या या व्यक्तीने भीक मागायला सुरुवात केली आहे. भीक मागून जमा होणारी रक्कम अभिनेत्याला पाठवणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ नाशिकमधील असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्यक्ती स्कूटीवर बॉलिवूडच्या ‘सिंघम’ विरोधात नाराजी व्यक्त करत भीक मागत आहे. त्याने ‘अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन’ म्हणत विरोध सुरू केला आहे. “मी आज ऑनलाइन गेम्सच्या विरोधात आंदोलन करत आहे. ऑनलाइन गेम्स आपल्या पिढ्या बरबाद करत आहेत. या लोकांना देवाने भरपूर दिलंय, पण तरीही ते अशा जाहिराती करून आपल्या पिढ्या खराब करत आहेत. त्यामुळे मी या भीक मांगो आंदोलनातून मिळणारे पैसे अजय देवगणला पाठवणार आहे. तसेच गांधीगिरी स्टाइलने त्याला अशा जाहिराती न करण्याची विनंती करणार आहे. तुला पैशांची आवश्यकता असेल तर मी पुन्हा भीक मागेन आणि तुला पैसे पाठवेन पण अशा जाहिराती करू नकोस,” असं तो म्हणाला.
या माणसाने लोकांनाही विनंती केली. तसेच आता तुमच्या घरातलं कोणीही ऑनलाइन गेम खेळत नसलं तरी येत्या काळात खेळेल, त्यामुळे तुम्ही खबरदारी बाळगा, असं आवाहन त्याने केलं.