बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठया पडद्यावर झळकणार आहे. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून एक नवा वाद निर्माण झाला आहे. काही हिंदू संघटनांनी या गाण्यावर तसेच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावरदेखील बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. या सगळ्या प्रकारावर मराठा मंदिर आणि जी ७ मल्टीप्लेक्स या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी भाष्य केलं आहे.
मनोज देसाईंनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ‘पठाण’ आणि बॉलिवूडबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना विचारण्यात आले की पठाण ‘चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल का?’ ते असं म्हणाले, “नाही मी माझ्या लोकांना सांगितले आहे सगळ्या प्रेक्षकांची नीट तपासणी झाली पाहिजे. आम्ही यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे जेणेकरून आमच्या चित्रपटगृहाचे नुकसान व्हायला नको आहे. सोशल मीडिया मोहिमेमुळे नुकसान होईल का हे आता सांगणं कठीण आहे २५ चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच सांगता येईल. प्रेक्षक कशाप्रकारे प्रतिसाद देत आहेत त्यामुळे त्यावेळी हे सांगणे योग्य ठरेल.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका सकारत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत.
“पठाण चालणार! आमचे हिंदू बघणार, पण मुस्लिम…” प्रसिद्ध चित्रपटागृहाच्या मालकाची भविष्यवाणी
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद याने केले असून यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे . त्याचबरोबरीने पठाणला टक्कर द्यायला राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.