Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. २०२५ मध्ये ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा ‘छावा’ पहिला सिनेमा ठरला आहे. याचबरोबर या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. पहिल्या दिवसापासून ‘छावा’ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील प्रत्येक सीनची चर्चा होताना दिसतेय. सध्या ‘छावा’ सिनेमातील एक थराराक सीन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सीन एका मराठी स्टंटगर्लने परफॉर्म केला आहे.

‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा, त्यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. सिनेमात औरंगजेब त्याचं लाखोंचं सैन्य घेऊन दिल्लीकडून महाराष्ट्राच्या दिशेने यायला निघतो असा एक सीन आहे. औरंगजेबाची फौज जेव्हा स्वराज्यात येते, तेव्हा एका मुलीला जिवंत जाळण्यात येतं. ही मुलगी शेळ्या-मेंढ्याबरोबर रानात आलेली असते. पण, अचानक काहीतरी विचित्र घडतंय असे संकेत मिळतात आणि या तरुणीला औरंगजेबाचं सैन्य जिवंत जाळतं असा थरारक सीन ‘छावा’ सिनेमात पाहायला मिळतो. औरंगजेब दिल्लीतून स्वराज्यात आलाय याचे संकेत त्याला महाराजांपर्यंत पोहोचवायचे असतात.

चित्रपटात हा सीन पाहताना प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. पडद्यामागे सुद्धा हा सीन शूट करताना प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. मराठी स्टंटगर्ल साक्षी सकपाळने हा सीन केला आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतल्याचं BTS व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ऑडिशनद्वारे तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. आगीपासून संरक्षण व्हावं यासाठी टीमने आधी कशी तयारी केली, अंगावर आग लावताच या स्टंटगर्लने हा सीन कसा केला, प्रत्यक्ष शूट करताना संपूर्ण टीमची मेहनत, सीन झाल्यावर या स्टंटगर्लला कसं सावरण्यात आलं. या सगळ्या गोष्टी व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

साक्षी सकपाळ हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “आगीच्या थरारक सीनचा BTS व्हिडीओ तुमच्याबरोबर शेअर करतेय…’छावा’मध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. मी आनंदी आहे आणि अर्थातच ती ‘आग’ अजूनही मनात कायम आहे. सेटवर सर्वांनी मला पाठिंबा दिला, मला मदत केली यासाठी खूप खूप धन्यवाद”

दरम्यान, या मराठी स्टंटगर्लचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, हा सीन स्वत: परफॉर्म केल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.

Story img Loader