२०२१ ला पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर राज मुंबईत ठिकठिकाणी वेगवेगळे मास्क घालून फिरतो अन् यामुळे तो कायम लोकांचं लक्ष वेधून घेतो. यामुळे त्याला ‘मास्क मॅन’ असंही नाव पडलं आहे. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती.
राज कुंद्रा आज तुरुंगातून बाहेर आलेला असला तरी केवळ मीडिया ट्रायलमुळे तो स्वतःचा चेहेरा मास्कमागे लपवतो असं मध्यंतरी त्याने स्पष्ट केलं होतं. आता राज मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बिझनेसच्या बरोबरीने राज हा एक उत्तम स्टँड अप कॉमेडीयन आहे हे नुकतंच प्रेक्षकांना समजलं आहे.
‘इंडी हॅबीटाट’च्या मंचावर नुकतीच राज कुंद्राने आपला मित्र आणि कॉमेडीयन मूनव्वर फारूकीच्या आग्रहाखातर हजेरी लावली. यावेळीही राज कुंद्राने चेहेऱ्यावर मास्क धारण केलेलाच होता. राजच्या या धमाकेदार एंट्रीने एकच धमाल आणली. नुकताच या स्टँड अप अॅक्टचा एक टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये राज स्वतःची ओळख करून देताना स्वतःला मास्क मॅन, शिल्पाचा पती, अन् स्वस्तातील कान्या वेस्ट असं म्हणाला ज्यावर लोक खळखळून हसली. याबरोबरच राज आपल्या जुन्या व्यवसायाबद्दल म्हणाला, “१८ व्या वर्षी मी लंडनमध्ये टॅक्सी चालवायचो, २१ व्या वर्षी पश्मीना शालीच्या व्यवसायात मी माझं नाव मोठं केलं. माझं काम आधीपासून कपडे परिधान करून द्यायचं होतं, माझं काम कपडे काढायचं कधीच नव्हतं.” राजच्या या विनोदाला सगळ्यांनीच दाद दिली.
सोशल मीडियावर या व्हीडीओवर बऱ्याच लोकांनी राज कुंद्राला ट्रोल केलं आहे तर काहींनी त्याच्या या विनोदाला दाद दिली तर काहींनी कॉमेडीयन मूनव्वरवर टीकाही केली. राज कुंद्राचा हा खास स्टँडअपचा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.