Dunki First Review: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘जवान’ व ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे वर्षं शाहरुखसाठी फार खास आहे कारण या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांपाठोपाठ किंग खानचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ या चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील दोन गाणी अन् एक छोटा टीझर आल्यापासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते.
आणखी वाचा : ‘अॅनिमल’च्या वादळात ‘सॅम बहादुर’चीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी; १२ व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
काहीच दिवसांपूर्वी याचा ट्रेलर आणि यातील आणखी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेत असताना दिसत आहे. अशातच आता ‘डंकी’चा पहिला रिव्यू समोर आला आहे. ‘मीडिया हब’ या न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार एका खात्रीशीर सूत्राने ‘डंकी’चा रिव्यू केला असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तो शेअर केला आहे.
‘मीडिया हब’ने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “डंकी हा राजकुमार हिरानी यांचा आणखी एक उत्कृष्ट चित्रपट आहे. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आजवर अशी कलाकृती झालेली नाही. फर्स्ट हाफमधील चित्रपटाची कथा, विनोदनिर्मिती, रोमान्स, मैत्री हे सगळं अद्भुत आहेच शिवाय सेकंड हाफमध्ये हा चित्रपट तुम्हाला प्रचंड भावुक करतो अन् डोळ्यात पाणी आणतो अन् यातील कोणतीही गोष्ट चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचणार आहे.”
प्रदर्शनाच्या एक आठवड्याआधीच चित्रपटाचा इतका सकारात्मक रिव्यू समोर आल्याने याची जबरदस्त चर्चा आहे. इंडस्ट्रीतीलच एका जाणकाराने हा रिव्यू शेअर केला असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच शाहरुखने ‘डंकी’च्या यशासाठी वैष्णोदेवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. प्रेक्षक किंग खानच्या आणखी एका जबरदस्त ब्लॉकबस्टरची आतुरतेने वाट बघत आहेत.
या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार हिरानी अन् शाहरुख खान हे प्रथमच एकत्र काम करत आहेत. ‘डंकी’मध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. २१ डिसेंबरला ‘डंकी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.