‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांच्या काही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. त्यांनी साकारालेली ‘पाकिजा’ तर कोणीच विसरु शकले नाही. चित्रपटरसिकांचे भान हरपणाऱ्या या सौंदर्यवतीचे आयुष्य रुपेरी पडद्यावर मोहक वाटायचे, पण तिचे खासगी आयुष्यात मात्र तसे नव्हते. अभिनयाबरोबरच शेरो-शायरी करणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेल्या ज्यामुळे त्या खचल्या होत्या. त्याच सर्व गोष्टी आणि या अभिजात सौंदर्य लाभलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनी लिओनीपासून कंगनापर्यंत कित्येक अभिनेत्रींची नावं या आगामी बायोपिकशी जोडली गेली होती. अखेर या बायोपिकबद्दल नुकतीच महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली. मीडिया रीपोर्टनुसार फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या बायोपिकचं दिग्दर्शन करणार असून तो या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘टी-सिरिज’ अन् भूषण कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर मीना कुमारी यांच्या भूमिकेसाठी क्रीती सेनॉनला घेतल्याचं स्पष्ट झालं. आता या बायोपिकवर मीना कुमारी यांच्या कुटुंबीयांनीआपत्ति दर्शवल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आणखी वाचा : “त्यांचं लग्न खोटं…” बॉलिवूडच्या ‘त्या’ लोकप्रिय जोडप्याबद्दलच कंगना रणौतची पोस्ट व्हायरल

मीना कुमारी यांचे पती आणि फिल्ममेकर कमल अमरोही यांचे सुपुत्र ताजदार अमरोही यांनी या चित्रपटाचे निर्माते, मनीष मल्होत्रा आणि क्रीती सेनॉन यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली आहे. याविषयी मीडियाशी बोलताना ताजदार म्हणाले, “चित्रपटसृष्टीतील काही लोक ही दिवाळखोर आणि दरोडेखोर बनली आहेत. ती माझी आई होती तर कमल अमरोही माझे वडील होते. या निर्मात्यांनी स्वतःच्या आई वडिलांवर खुशाल चित्रपट बनवावे. ते जो चित्रपट बनवतील तो खोट्या गोष्टींवरच बेतलेला असेल अशी माझी खात्री आहे.”

आमच्या परवानगीशिवाय कुणीही हा चित्रपट बनवणार नाही आणि यासाठी कायदेशीर मार्गाने लढण्याची तयार असल्याचंही ताजदार यांनी स्पष्ट केलं. ताजदार व त्यांची बहीण दोघे मिळून याविरोधात कोर्टात केस करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल ३ दशकं आणि ९० चित्रपटात काम केलेल्या मीना कुमारी यांची अदाकारी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये क्रीती सनॉन दिसणार असल्याचं स्पष्ट होताच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या प्रकरणावर नेमका पडदा पडणार की नाही ते येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meena kumari son against bollywood filmmakers who are making biopic on actress life avn