९० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री म्हणून मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri)ची ओळख आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत दिग्दर्शकाने चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी मागितलेले मानधन देण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे तिला रडू कोसळले होते, अशी आठवण सांगितली आहे.
मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
मीनाक्षी शेषाद्रीने नुकतीच ‘फ्रायडे टॉकीज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘डकैत’ या चित्रपटाची आठवण सांगत अभिनेत्रीने म्हटले, “राहुल रवैलजी मला भेटायला आले. मी विचार केला की ‘बेताब’, ‘अर्जुन’ आणि ‘लव्ह स्टोरी’ असे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करेन. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, सनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल आणि त्याच्या कुटुंबाला या चित्रपटात महत्त्व असेल. पण, पाच-सहा सीन आणि दोन-तीन गाण्यांमध्ये तू दिसशील. हे सर्व उत्तमरित्या केले जाईल. त्यांच्याकडे त्या सीनसाठी चांगला कंटेंट आहे आणि मी माझ्या चित्रपटातील नायिकांना सुंदररित्या दाखवण्यावर विश्वास ठेवतो. मी त्यांना सांगितले की, त्यांना मला पटवून देण्याची गरज नाही. “
याबद्दल पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “मला ही संधी मिळाली, त्याबद्दल खूश होते. मात्र, जेव्हा मी सांगितलेल्या फीसपेक्षा ते मला कमी पैसे देऊ लागले, त्यावेळी मला दु:ख झाले. चित्रपटाच्या करारावर सही करण्याच्यावेळी मी रडत होते. त्यांनी मी मागितलेले मानधन देण्यास स्पष्ट नकार दिला. ते मला म्हणाले, मी इतके मानधन देऊ शकत नाही, तू माझ्याबरोबर काम करत आहेस तेच तुला मिळणारे मानधन आहे; मी जे काही देईन ते आनंदाने घे. मी त्यांची खूप मोठी चाहती होते, त्यामुळे मी रडत रडत स्मितहास्य केले आणि चित्रपटात काम करण्यास होकार दिला”, अशी आठवण मीनाक्षी शेषाद्रीने सांगितली आहे.
u
‘डकैत’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर या चित्रपटाचे कथानक जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. या चित्रपटाची निर्मिती राहुल रवैल यांनी केली आहे. सनी आणि मीनाक्षी यांच्याबरोबर राखी आणि रजा मुराद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. एका सामान्य व्यक्तीला जमीनदारांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कसे सामोरे जावे लागते, यावर आधारित हा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. समीक्षकांकडून या सिनेमाचे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले होते.