विकी कौशल आणि मेघना गुलजार यांचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. टीझर आणि पोस्टरनंतर काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल मीडियावर त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे.
ट्रेलरमध्ये विकी कौशलने देहबोली, संवादफेक, फील्ड मार्शलच्या भूमिकेसाठीचा अॅटीट्यूड यावर प्रचंड मेहनत घेतल्याचं जाणवत आहे. सॅम माणेकशा यांच्या हालचालीपासून बोलण्याची लकब अगदी हुबेहूब विकीने पकडली आहे. विकीच्या करिअरमधील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विकीच्या महेनतीचे कौतुक केले. आता नुकतंच या चित्रपटातील ‘बढते चलो’ हे पहिलं गाणं समोर आलं आहे.
आणखी वाचा : पाकिस्तानात राहून २०,००० भारतीय सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर’ची कहाणी ठाऊक आहे का?
ट्रेलरप्रमाणेच हे गाण ऐकताना तुमच्यात उत्साह आणि देशभक्ती संचारेल. अशाच पद्धतीने हे गाणं सादर करण्यात आलं आहे. या गाण्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यात सॅम यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या विविध रेजिमेंट दाखवण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एका रेजिमेंटला आपण या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देताना पाहायला मिळत आहे. ही रेजिमेंट म्हणजे मराठा रेजिमेंट असू शकते असा अंदाज लावण्यात येत आहे.
संपूर्ण गाणं प्रेरणा देणारं आहेच पण यातील छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली मानवंदना प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिली आहे. याबरोबरच दुर्गा माता, बजरंगबली, बिरसा मुंडा यांचाही जयघोष या गाण्यात तुम्हाला ऐकायला मिळेल. या गाण्यात सॅम माणेकशा हे भारतीय जवानांना मार्गदर्शन करताना आणि वेगवेगळ्या मोहीमा आखताना दिसत आहेत. या गाण्याचे शब्द मेघना यांचे वडील व प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत. तर हे गाणं शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केले आहे.
शंकर महादेवन, विशाल दडलानी व दिव्या कुमार यांच्या आवाजातील हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. ‘सॅम बहादूर’मध्ये विकी कौशलसह नीरज काबी, सान्या मल्होत्रा, फातीमा सना शेख, मोहम्मद झीशान अयुब, आशिष विद्यार्थी यांसारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गेली ७ वर्षं मेघना गुलजार या चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ही प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे.