गायक मिका सिंग या वर्षाच्या सुरुवातीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्याबद्दल व्यक्त झाला आहे. त्याच्या परफॉर्मन्ससाठी त्याला खूप जास्त मानधन मिळालं, मात्र अंबानींनी त्याला महागडं घड्याळ भेट न दिल्याने तो नाराज आहे. अंबानी कुटुंबाने अनंतचे जवळचे मित्र आणि बॉलीवूडमधील निवडक लोकांना दोन कोटी रुपये प्रत्येकी किंमत असलेले घड्याळ भेट दिले.
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मिकाने घड्याळ न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “मी अनंत अंबानींच्या लग्नात परफॉर्म करायला गेलो होतो. त्यांनी प्रत्येकाला भरपूर पैसे वाटले, अगदी मलाही. पण मला एका गोष्टीची नाराजी आहे. त्यांच्या काही जवळच्या लोकांना जे घड्याळ मिळालं ते मला मिळालं नाही,” असं मिका म्हणाला. जर अनंत अंबानीने ही मुलाखत पाहिली तर मला ते महागडं घड्याळ भेट देण्याचा विचार करावा, असं मिकाने म्हटलं.
राधिका-अनंतच्या लग्नात किती मानधन मिळालं?
मिकाने त्याला किती मानधन मिळालं, त्याचा आकडा सांगितला नाही. मात्र, अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म केल्यावर मिळालेल्या मानधनात तो पुढील पाच वर्षे आरामात जगू शकतो, असं तो म्हणाला. “मला खूप जास्त मानधन दिलंय, पण ही रक्कम किती होती हे मी सांगू शकत नाही. पण तुम्हाला अंदाज यावा यासाठी सांगतो की मला इतके पैसे मिळाले की मी त्यात पाच वर्षे सहज जगू शकेन. माझा फार खर्च नाही. त्यामुळे मी त्या पैशातून पाच वर्षे आरामात राहू शकतो,” असं मिकाने नमूद केलं.
मिकाने लग्नासारख्या खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करून कलाकार पैसे कमवतात, याकडे लक्ष वेधले. स्वतःचे आणि त्याचा भाऊ दलेर मेंहंदी यांचे उदाहरण देत तो म्हणाला, “आम्ही दोघे भाऊ जेव्हा लग्नात गायचो तेव्हा लोकांना वाईट वाटायचं की आम्ही लग्नात गातो. पण आता प्रत्येकजण लग्नात गातोय. कोणीही मोठ्या शोमध्ये जाऊन परफॉर्म करत नाही. आता सगळे लग्नात गाऊन सर्व पैसे कमवत आहेत.”
मुकेश अंबानी यांनी अनंतच्या मित्रांना तसेच अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांना ऑडेमार्स पिग्युट लिमिटेड-एडीशन लक्झरी घड्याळं भेट म्हणून दिली होती. प्रत्येक घड्याळाची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त होती. अनंत-राधिका यांच्या लग्नातील या घड्याळाचा एक फोटोदेखील खूप व्हायरल झाला होता.