प्रसिद्ध गायक मिका सिंग गेली अनेक वर्ष आपल्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावत आला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने स्वतःसाठी एक बेट खरेदी केलं होतं आणि त्याचे काही फोटोही त्याने शेअर केले होते. पण आता त्याने त्याच्या मित्राला एक मौल्यवान भेट दिली आहे.
मिका सिंगने त्याचा बालपणीचा मित्र कंवलजीत सिंगला थेट मर्सिडीज कार भेट म्हणून दिली आहे. मिकाचा मित्र कंवलजीत सिंगने या मर्सिडीज जीएल क्लास कारचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तो आणि मिका सिंग कारसोबत पोज देताना दिसत आहेत. कंवलजीतने आपली ड्रीम कार गिफ्ट म्हणून मिळाली याबद्दल एक मोठी पोस्टही लिहिली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर त्याचा आणि मिकाच फोटो शेअर करत लिहिलं, “गेली ३० वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. तो माझ्यासाठी फक्त एक मित्र किंवा बॉस नाही तर आम्ही आयुष्यभरासाठी भाऊ आहोत. पाजी, मला माझी आवडती गाडी भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुझे हृदय खूप मोठे आहे. तुझ्याकडून ही भेट मिळाल्याने मला खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” मिकाने कंवलजीत भेट दिलेल्या मर्सिडीज कारची किंमत ८० लाख आहे.
हेही वाचा : ‘सिंग इज किंग’, मिकाने खरेदी केले खासगी बेट आणि…
आता इतकं मोठं मन दाखवल्याबद्दल मिकाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. याबाबत बोलताना मिका सिंग म्हणाला, “आपण नेहमी आपल्यासाठी सर्व काही विकत घेतो, पण आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या लोकांचा विचार करत नाही. माझ्या मित्राला खूप आनंद मिळावा असं मला वाटतं.” त्यामुळे आता सर्वत्र मिकाच्या या दानशूरपणाची चर्चा रंगली आहे.