शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ या चित्रपटावरून गेले काही दिवस जोरदार वाद सुरू आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. याबाबत अनेक सेलिब्रिटी भाषी करत त्यांचं मत व्यक्त करत आहेत. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाच काहीजणं दीपिकाला समर्थन देताना दिसत आहेत. आता अभिनेता मिलिंद सोमण याने या वादावर भाष्य केलं आहे.
अभिनेता मिलिंद सोमण हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. त्याच्या व्यक्तव्याने, वागण्याने अनेकदा वाद निर्माण होता असतात. काही वर्षांपूर्वी त्याने न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण खूप गाजलं. याचीच आठवण मिलिंदला ‘पठाण’चा वाद सुरू असताना झाली आहे.
‘टाइम्स नाऊ’ला मुलाखतीत मुलाखतीत “ही कला आहे की अश्लीलता आहे, यावर कोर्टानेच विचार करून निर्णय द्यावा” असं मत त्याने मांडलं. या वादावर भाष्य करताना त्याला स्वतःच्या न्यूड फोटोशूटचीही आठवण झाली. त्याचा उल्लेख करत तो म्हणाला, “कोणीही कधी संपूर्णपणे समाधानी असू शकत नाही. माझ्या न्यूड फोटोशूट वरूनही वाद निर्माण झाला होता. त्या वादात माझ्या आयुष्यातली १४ वर्षे खर्ची झाली आहेत. प्रत्येकाला आपापली मतं आहेत आणि प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. पण कोणी जर काही आक्षेपार्ह बोललं किंवा केलं तर त्यावर कोर्टच निर्णय देईल.”
हेही वाचा : मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले
दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.