शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे लेकप्रिय सेलिब्रिटी जोडपं आहे. शाहिद कपूरचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालाय. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शाहिदच्या प्रत्येक गोष्टीत मीरा नेहमीच त्याची साथ देताना दिसते. ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपटाचा रिव्ह्यू तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता आणि आता शाहिदचा अभिनय क्षेत्रातील प्रवास दाखवणारा चाहत्यांनी बनवलेला व्हिडीओ मीराने रिपोस्ट केला आहे.
शाहिद कपूर एक उत्तम अभिनेता व चांगला डान्सरही आहे. शाहिदच्या फॅन पेजवर डान्सरपासून अभिनेत्याचा प्रवास सांगणारा व्हिडीओ चाहत्यांनी बनवला होता. या व्हिडीओत ऐश्वर्या राय अभिनीत ‘ताल’ या चित्रपटातील शाहिदचा डान्स आहे जिथे शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसत आहे तर पुढे ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या शाहिदच्या चित्रपटातील त्याचा आणि क्रिती सॅननचा दमाखेदार डान्सही यात आहे. “शाहिदचा डान्स पाहणं किती आनंददायी आहे, तो प्रशिक्षित डान्सर आहे आणि तो प्रत्येक गाण्याला न्याय देतो. एका बॅकग्राउंड डान्सरपासून ते उत्कृष्ट अभिनेता आणि नर्तक! शाहिद खूप अष्टपैलू आहे. एका व्यक्तीमध्ये इतक टॅलेंट आहे. त्याच्या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनही कौतुकास्पद आहे,” असं कॅप्शन फॅनपेजवरील व्हिडीओला देण्यात आलं होतं.
मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ रिपोस्ट केला. या व्हिडिओला कॅप्शन देत मीराने लिहले, ‘ताल’ मधील बॅकग्राउंड डान्सरपासून आतापर्यंतच्या सर्व नृत्यांना त्याने मास्टरपिस बनवलं आहे.
दरम्यान, शाहिदचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ चित्रपट चौथ्या दिवशीही चित्रपटगृहात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. या चित्रपटात शाहिद कपूर एका रोबोट सायंटिस्टच्या भूमिकेत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन एआय रोबोटच्या भूमिकेत आहे. डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार या कलाकारांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.