Mirzapur The Film Coming Soon : ओटीटीच्या दुनियेत बहुचर्चित आणि लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या वेब सीरिज पैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’. या वेब सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले. या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. गुड्डू पंडीत आणि कालीन भैय्याच्या मिर्झापूरच्या दुनियेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे या यशानंतर अॅमेझॉन एमजीए स्टुडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनने एक मोठी घोषणा नुकतीच केली आहे. ओटीटीनंतर आता ‘मिर्झापूर’ मोठा पडदा गाजवणार आहे. म्हणजेच लवकरच ‘मिर्झापूर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
५ जुलैला ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती. या तिसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता निर्मात्यांनी या सीरिजचा थ्रिलर अनुभव प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर देण्याचं ठरवलं आहे. नुकताच ‘मिर्झापूर’ ( Mirzapur ) चित्रपटाचा एक टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडीत आणि मुन्ना भैय्या जबरदस्त कमबॅक पाहायला मिळत आहेत.
सुरुवातीलाच कालीन भैया म्हणतो की, तुम्हाला खुर्चीचं महत्त्व माहितच आहे. सन्मान, शक्ती आणि सत्ता. तुम्ही देखील ‘मिर्झापूर’ आपापल्या खुर्चीवर बसून पाहिली आहे. पण यावेळी खुर्चीवरून उठला नाही तर रिस्क आहे. त्यानंतर गुड्ड पंडीची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. तो म्हणतोय, “कालीन भैय्या बरोबर म्हणाले. रिस्क घेणं ही आमची युएसबी आहे. पण आता संपूर्ण खेळ बदलला आहे. ‘मिर्झापूर’ तुमच्याजवळ येणार नाही. तर तुम्हालाच ‘मिर्झापूर’कडे यावं लागेल.” पुढे गुड्डूनंतर मुन्ना भैय्याची जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे. मुन्ना आपण अमर असल्याचं सांगताना दिसत आहे. हा दमदार टीझर शेअर करत ‘मिर्झापूर’ ( Mirzapur ) चित्रपट लवकरच भेटीस येत असल्याचं जाहीर केलं आहे.
हा जबरदस्त व्हिडीओ पाहून चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी मुन्ना भैय्याचं स्वागत केलं आहे. तर बऱ्याच जणांना काही प्रश्न पडले आहेत. एका नेटकऱ्याने विचारलं की, सगळे सीझन एकत्र करून चित्रपट तर करत नाहीत ना?
‘मिर्झापूर’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
दरम्यान, गुरमीत सिंह दिग्दर्शित ‘मिर्झापूर’ ( Mirzapur ) चित्रपट २०२६ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, मुन्ना त्रिपाठी, अभिषेक बनर्जीसह इतर कलाकारदेखील पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘मिर्झापूर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यानी प्राइम मेबर्स भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात.