काही कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले. अनेकांना त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले. अशीच एक लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री आहे, जी अवघ्या २७ व्या वर्षी विधवा झाली होती. या अभिनेत्रीला पतीच्या निधनाचा धक्का बसला आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. या अभिनेत्रीचं दिवंगत स्मिता पाटील यांच्याशी कनेक्शन आहे.
या अभिनेत्रीचं नाव विद्या माळवदे आहे. विद्याने ‘चक दे इंडिया’ चित्रपटात काम केलं होतं. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने विद्याला ओळख मिळवून दिली. विद्या प्राजक्ता कोळीच्या ‘मिस्डमॅच’ या गाजलेल्या सीरिजमध्ये ‘झीनत करीम’ ही भूमिका साकारली आहे. विद्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
विद्या सिनेविश्वात येण्याआधी एअरहोस्टेस होती. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या चढ-उतारांनंतर तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. तिने कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
२४ व्या वर्षी लग्न, तीन वर्षांनी पतीचे निधन
विद्या एअरहोस्टेस म्हणून काम करत होती, त्याचदरम्यान तिची भेट कॅप्टन अरविंद सिंह बग्गाशी झाली, तो पायलट होता. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी १९९७ मध्ये लग्न केलं. तेव्हा विद्या २४ वर्षांची होती. दोघेही वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते, मात्र लग्नानंतर तीन वर्षांनी २००० साली विद्याच्या पतीचे निधन झाले.
विद्याच्या पतीचे प्लेन क्रॅशमध्ये निधन झाले. पतीचा मृत्यू झाला, त्यावेळी ती जर्मनीत होती. पतीच्या निधनाबद्दल समजताच विद्याला धक्का बसला आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तिने आत्महत्या करायला झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या, असं म्हणतात. पण तिला तिच्या वडिलांनी असं धक्कादायक पाऊल उचलण्यापासून रोखलं. विद्या नंतर हळूहळू सावरली आणि तिने आयुष्यात पुढे जायचं ठरवलं.
पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी केलं दुसरं लग्न
त्या कठीण टप्प्यातून सावरण्यासाठी विद्याने ध्यान आणि योगाची मदत घेतली. पतीच्या निधनानंतर तिने एअर होस्टेसची नोकरी सोडली. त्यानंतर तिने काही मॉडेलिंग असाइनमेंटमधून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. काही प्रोजेक्ट केले, २००९ मध्ये तिने ‘रामजी लंडनवाले’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय दायमा यांच्याशी दुसरं लग्न केलं.
विद्या ५२ वर्षांची झाली आहे, पण तिला मूलबाळ नाही. विद्याचं दिवंगत स्मिता पाटील यांच्याशी एक खास कनेक्शन आहे. नात्यात ती स्मिता यांची भाची आहे.