बुद्धीमत्ता आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली. अवघ्या २० व्या वर्षी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेची तयारी करण्यासाठी मानुषी मुंबईत आली होती. परंतु, वैद्यकीय शिक्षण ते ‘मिस वर्ल्ड’ हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. मुंबईत आल्यावर तिने स्वत:साठी काही नियम आखले होते. याविषयी तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या आठवणी सांगताना मानुषी ‘एबीपी लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “आयुष्यात कोणतेही काम करताना शिस्त आणि नियम खूप महत्त्वाचे असतात. लहानपणापासूनच मी स्वत:साठी विशिष्ट नियम बनवले होते. दहावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना माझ्या रुममध्ये मी सर्वत्र करिअरसाठी प्रोत्साहन देणारे पोस्टर्स लावले होते. त्यानंतर जेव्हा मी ‘मिस वर्ल्ड’साठी तयारी करु लागले तेव्हा सुद्धा मी स्वत:साठी काही विशिष्ट मर्यादा आखून घेतल्या होत्या.”
मानुषी पुढे म्हणाली, “मुंबईला मी अवघ्या २० व्या वर्षी आले होते. तेव्हा मला ‘मिस इंडिया’मधील एक मॅनेजर भेटले. त्यांनी मला सांगितले, मी मुंबईत मोठमोठी स्वप्न घेऊन येणाऱ्या अनेक लोकांना पाहतो. पण, कालांतराने वाईट सवयींमुळे या लोकांचे करिअरकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या या बोलण्याचा मी फार गांभीर्याने विचार केला. त्याच दिवशी घरी येऊन मी स्पर्धेपर्यंत ‘ना धुम्रपान, ना बॉयफ्रेंड फक्त मिस वर्ल्ड हे एक ध्येय’ असे नियम बनवले आणि माझ्या रुममध्ये लिहिले. अशाप्रकारे आयुष्यात नेहमी मी वेळेनुसार स्वत:ला बंधन घालते.”
दरम्यान, ‘मिस वर्ल्ड’ जिंकल्यानंतर मानुषी छिल्लरने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. लवकरच ती ‘ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.