चांद्रयान -३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत इतिहास रचला. भारताच्या चांद्रयान मोहिमेला यश आलं असून संपूर्ण देश या यशाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर फक्त चांद्रयान-३चीच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तसेच मराठी कलाकारांनीही पोस्ट शेअर करत या अद्भुत कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर तर प्रत्येकजण ही गोष्ट अत्यंत अभिमानाने शेअर करत आहे. आता अशातच या मिशनवर येणाऱ्या चित्रपटाची घोषणाही झाली आहे. अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाने ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगवर प्रतिक्रिया देताना यावर चित्रपट बनवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “चंद्रावर बसणारा पहिला भारतीय…” सचिन पिळगांवकरांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची जोरदार चर्चा
चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ति यांनी एका वेबसाईटशी संवाद साधताना ‘चांद्रयान ३’ या मोहिमेवर चित्रपट काढायची इच्छा व्यक्त केली आहे. जगन म्हणाले, “यावर मी सध्या विचार करतो आहे. माझ्या बहिणीशी मी याबद्दल चर्चा करून लवकरच यावर काम सुरू करणार आहे. ही संधी आम्ही सोडणार नाही.” चांद्रयान मोहिमेच्या यशस्वी लँडिंगनंतर लगेचच यावर चित्रपट बनवायची कल्पना डोक्यात आल्याचंही जगन यांनी स्पष्ट केलं.
जगन शक्ति यांची मोठी बहीण इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करते, त्यामुळे तिच्याशी चर्चा करूनच यावर काम सुरू करण्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर ‘मिशन मंगल’च्याच टीमबरोबर काम करण्याची इच्छा जगन यांनी व्यक्त केली आहे. अक्षय कुमारबद्दल मात्र त्यांनी बोलायचं टाळलं आहे. याबद्दल लवकरच घोषणा करण्यात येईल असंही जगन यांनी सांगितलं आहे.