ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोलकात्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “ते १००% ठीक आहेत आणि हे त्यांचे रुटीन चेकअप आहे,” अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा मिमोहने ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिली.
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते व भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला. पुरस्काराची घोषणा झाल्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता. “मला हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी स्वतःसाठी कधीच कोणाकडे काहीही मागितलं नाही. न मागता काहीतरी मिळाल्याची भावना काय असते ते आज मी अनुभवत आहे. ही एक वेगळीच आणि खूप छान भावना आहे,” असं ते म्हणाले होते.