दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. याआधी मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याआधी त्यांनी अनेक मुलाखतींमधून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवास मांडला केला आहे. त्यांना त्यांच्या रंगामुळे अनेक वर्षे काम मिळत नव्हते, याबरोबरच त्यांचा अपमानदेखील केला जायचा, अशी खंत व्यक्त केली होती.
काय म्हणालेले मिथुन चक्रवर्ती?
‘सा रे गा म पा लिटल चॅम्प्स’च्या मंचावर त्यांनी आपल्या प्रवासाची माहिती देताना त्यांनी, आपण जो संघर्ष केला आहे, तसा संघर्ष कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी व्यथा मांडली होती. “प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचा काळ येतो आणि त्या कठीण काळाचा, दिवसांचा सामना करावा लागतो. पण, मला नेहमी माझ्या रंगावरून नाकारले गेले आहे. माझा अपमान करण्यात आला आहे. अनेक वर्षे माझ्या रंगामुळे माझा अनादर करण्यात आला.”
पुढे या अभिनेत्याने, “मी अनेकदा झोप मिळण्यासाठी रडलो आहे, रस्त्यावर झोपणे, अन्न मिळवण्यासाठी धडपड करणे, असा संघर्ष मी केला आहे. अनेकदा मला भुकेल्या पोटी तसेच झोपावे लागत असे. ते असे दिवस होते की, ज्यावेळी मला, कुठे झोपायला मिळेल आणि काय खावे लागेल, असा विचार करावा लागत असे. मी खूप वेळा फूटपाथवर झोपलो आहे”, अशी आठवण सांगितली होती.
हा संघर्ष इतका टोकाचा होता की, एक क्षण असा आला ज्यावेळी मी माझे आयुष्य संपवण्याचा विचार केला होता. कारण- घरी परतण्याचा पर्याय नव्हता. अली पीटर जॉनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नक्षल चळवळीत असलेल्या सहभागाबद्दल सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, “इंडस्ट्रीमधील आणि बाहेरील लोकांना कोलकातामधील नक्षली चळवळीतील माझ्या सहभागाबद्दल माहीत आहे. नक्षली चळवळीचे नेते चारू मुजुमदारबरोबर माझा जवळचा संबंध होता. माझ्या कुटुंबाला टार्गेट केल्यानंतर मी नक्षली चळवळीतून बाहेर पडलो. पण त्यानंतर मी जिथे गेलो, तिथे नक्षलवादी असल्याचा शिक्का माझ्याबरोबर होता. मग ते पुण्यातील एफटीआयआय (FTII)असो किंवा जेव्हा ७० च्या दशकाच्या उत्तर्धात मुंबईत आलो तेव्हाही नक्षलवादी असल्याची ओळख कायम होती.
दरम्यान, १९७६ मध्ये ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांना पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिथुन चक्रवर्तींनी १९८० च्या दशकात ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’ व ‘कसम पैदा करने वाले की’ अशा अनेक चित्रपटांत अभिनय करीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. या चित्रपटांनंतर त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.