मिथुन चक्रवर्ती यांचा धाकटा मुलगा नमाशी चक्रवर्तीने नुकतंच बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केलं आहे. नमाशीचा ‘बॅड बॉय’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला यथातथाच प्रतिसाद मिळाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. नुकतंच नमाशीने त्याची आई व अभिनेत्री योगिता बाली यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. प्रेक्षक कायम मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटाबद्दल बोलतात पण आई योगिता बाली हीच्या चित्रपटांचा उल्लेख कुणीच करत नाही अशी खंत नमाशीने व्यक्त केली आहे.
याबरोबरच नमाशीने आपल्या आईच्या अभिनय कौशल्याचंही कौतुक केलं आहे. योगिता या त्यांच्या काळातील फार उमदा अभिनेत्री होत्या परंतु लोक नमाशीला कायम मिथुन यांचा मुलगा म्हणूनच ओळखतात ही गोष्ट त्याला खटकत असल्याचा त्याने खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर आई योगिता बाली व मिथुन यांना एकत्र स्क्रीनवर पाहणं नमाशीला पसंत असल्याचंही त्याने सांगितलं.
‘आज तक’शी संवाद साधताना नमाशी म्हणाला, “माझ्याशी लोक जेव्हा संवाद साधतात तेव्हा जास्तकरून ते माझ्या वडिलांचाच उल्लेख करतात, कुणीच आजवर माझ्या आईचा उल्लेखही केलेला नाही. माझी आई त्याकाळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, परंतु लोकांचं लक्ष हे माझ्या वडिलांकडेच जातं. माझं माझ्या आईशी एक खास नातं आहे, आज तिच्यामुळे आमचं कुटुंब आणि आम्ही मंडळी एकमेकांना धरून आहोत.”
पुढे आपल्या आईने केलेल्या चित्रपटांबद्दलही नमाशीने खुलासा केला आहे. नमाशी म्हणाला, “मी माझ्या आईचे काही चित्रपट पाहिले आहेत, पण तिला फार विचित्र वाटतं, मी तिचे चित्रपट पाहू नये असं तिचं म्हणणं असतं. ७० ते ८० च्या दशकात आईने १०० हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यापैकी ‘अजनबी’ व ‘बेशक’ हे दोन माझे आवडते चित्रपट आहेत. मी ऑनस्क्रीन तिला फक्त वडिलांबरोबरच पाहू शकतो. जेव्हा ती कोणा दुसऱ्या हीरोबरोबर असते ते मला आवडत नाही. मी लहानपणापासून वडिलांना अभिनय करताना पाहिलं आहे, पण जेव्हा मी आईला स्क्रीनवर पाहतो तेव्हा मला थोडं वेगळं वाटतं.”
७० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘परवाना’ आणि ‘गंगा तेरा पानी अमृत’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर योगिता यांनी ‘कुंवारा बाप’, ‘अजनबी’, ‘अपमान’ आणि ‘सौदा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. योगिता दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री गीता बाली यांची भाची आहे. १९७८ मध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्याशी घटस्फोट घेतला व मिथुन चक्रवर्तीसह लग्नगाठ बांधली. नमाशी व्यतिरिक्त त्यांना महाक्षय, उष्मे आणि दिशानी अशी चार मुले आहेत.