Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात ८ ऑक्टोबर रोजी अभिनेते मिथुन चक्रवर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते मिथुन चक्रवर्तींना मिठुनदा असंही संबोधण्यात येतं

अभिनेते मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty ) यांना मिठुनदा असंही संबोधण्यात येतं. आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती ( Mithun Chakraborty ) यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. तसंच तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे . मिठुनदा (Mithun Chakraborty) यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती जी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

स्वामी विवेकानंद चित्रपटात केलं रामकृष्ण परमहंस यांचं काम

मिथुन चक्रवर्तींनी (Mithun Chakraborty) ‘स्वामी विवेकानंद’ या १९९८ मध्ये आलेल्या चित्रपटात रामकृष्ण परमहंस ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच आत्तापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मणिरत्नम दिग्दर्शित गुरु या चित्रपटात त्यांनी साकरलेलं माणिकदास गुप्ता हे पात्र रामनाथ गोयंका यांच्या आयुष्यावर आधारित होतं. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. आता चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

मृगयाने ओळख दिली

१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली . ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता . १९८२ मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. १०० कोटी क्लबमध्ये गेलेला हा हिंदी सिनेसृष्टीतला पहिला चित्रपट आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळतो?

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे . माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो . भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty to be honored with dadasaheb phalke award pm modi calls him a cultural icon scj