पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनापक्षाने कायमच विरोध केला आहे. मागे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पक्षाने पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना विरोध दर्शवला होता तसेच रेडिओ वाहिन्यांनी पक्षितांनी कलाकारांची गाणी वाजवू नयेत असा इशारा दिला होता. मशिदीवरील भोंग्यानंतर आता मनसे पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट शेअर करत बॉलिवूडच्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. त्यांनी असं लिहलं आहे की, ‘बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. असं कानावर येतंय, ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावी लागते. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतील कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमेय खोपकर यांनी मध्यंतरी एका वहिनीला त्यांनी असाच इशारा दिला होता. प्रो कबड्डी सामन्यांचे मराठीतून समालोचन वगळण्यात आले होते म्हणून त्यांनी ट्वीट करत यावर भाष्य केलं होत. नुकतंच त्यांनी हर हर महादेव चित्रपटावरून झालेल्या राजकीय गदारोळावरून आपले मत मांडले होते.
फवाद खान, माहिरा खान, इम्रान अब्बास, जावेद शेख या पाकिस्तानी अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. तसेच बॉलिवूडमधील नसरुद्दिन शाहसारख्या अभिनेत्यांनी पाकिस्तानी चित्रपटात काम केले आहे.