Mohini Day : प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांचा पत्नी सायरा बानू यांच्याशी घटस्फोट झाला आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी अधिकृतपणे आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ए आर रेहमान यांना संगीतात बास वादक म्हणून साथ देणारी कलाकार मोहिनी डेच्या घटस्फोटाची बातमी समोर आली, त्यामुळे मोहिनी डेचं नाव ए आर रेहमान यांच्याशी जोडलं गेलं. त्यावर मोहिनीने आता या दोघांच्या नात्याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. तिची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
मोहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हि़डीओ शेअर केला आहे. याध्ये ए आर रेहमान तिच्या वडिलांसारखे आहेत, असं तिने म्हटलंय. तसेच तिने यात तिच्या नात्याचा आणि सध्या ती ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यावरून तिच्या गोपनीयतेचा आदर करावा, असं सांगितलं आहे.
हेही वाचा : राखी सावंतने ४६ वा वाढदिवस ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याबरोबर केला साजरा, दुबईतील व्हिडीओ व्हायरल
मोहिनी डे नेमकं काय म्हणाली?
“माझ्या आयुष्यात वडिलांसारखे अनेक रोल मॉडल आहेत. मी स्वत:ला फार भाग्यवान समजते की, अशा व्यक्तींच्या सानिध्यात माझ्यावर चांगले संस्कार झाले. ए आर त्यांच्यातीलच एक आहेत. ए आर म्हणजे ए आर रेहमान. मी त्यांचा फार आदर करते. ते अगदी माझ्या वडिलांसारखे आहेत. खरंतर ते माझ्या वडिलांपेक्षा वयाने थोडे लहान आहेत. मला वाटतं, त्यांची मुलगी माझ्याच वयाची आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा फार आदर करतो”, असं मोहिनीने सांगितलं आहे.
मोहिनीने आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हटलं की, “मी ए आर रेहमान यांच्याबरोबर साडे आठ वर्षे बास वादक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर मी पाच वर्षांआधी अमेरिकेला आले आणि इथे मी दुसऱ्या संगीत ग्रुपबरोबर काम सुरू केलं. माझा स्वत:चा एक संगीत बँडसुद्धा आहे, त्यासाठी मी विविध ठिकाणी कार्यक्रम करते. असो, ही स्टोरी फार छोटी आहे. कृपया सर्वांनी दया दाखवावी आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. हा आमच्या आयुष्यातील खासगी विषय आहे, जो सर्वाधिक वेदनादायी आहे.”
हेही वाचा : अर्जुन कपूरने ‘सिंगल’ आहे, असं म्हटल्यानंतर मलायका अरोराची ‘ती’ पोस्ट चर्चेत
हा व्हिडीओ पोस्ट करत तिने यावर मोठं कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात तिने लिहिलं की, “ए आर रेहमान यांच्याबरोबर माझं नाव जोडलं गेलं, हे सर्व पाहून मला फार वाईट वाटलं. मीडियाने या दोन्ही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या. एका लहान मुलीप्रमाणे मी ए आर रेहमान यांच्याबरोबर माझ्या कामाला सुरुवात केली. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. या काळात मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. मात्र, अशा वाईट प्रसंगातून जाताना लोकांच्या मनात आमच्याविषयी असे विचार येणे, हे मनाला फार वेदना देणारे आहेत. ए आर रेहमान माझ्या वडिलांसारखे आहेत.”