प्रसिद्ध पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने २२ डिसेंबर २०२४ रोजी वाराणसीत तिचा कॉन्सर्ट अर्ध्यावर सोडला. या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मोनालीने कॉन्सर्ट अर्ध्यावर सोडल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे. याच व्हिडीओत मोनालीने कॉन्सर्टमध्ये पायाभूत सुविधा नसल्याचे कारण दिले.
वाराणसीमधील या कार्यक्रमाचे आयोजक आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे तिने कार्यक्रमातून माघार घेतली असे मोनालीने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोनालीने चाहत्यांशी संवाद साधला आहे. ती व्हिडीओत म्हणते,”माझ्या टीमला आणि मला इथं परफॉर्म करायचं होतं, यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो, इथल्या पायाभूत सुविधांबद्दल काय बोलावं? ती जबाबदारी इथल्या व्यवस्थापकांची होती. पैसे चोरी करण्यासाठी यांनी या स्टेजवर हे काय केलं आहे हे मी समजावून सांगू शकत नाही.” असे तिने नमूद केले.
मोनाली ठाकूरने पुढे सांगितले, “मी वारंवार सांगत होते की, अशा परिस्थितीत मला माझा पाय मुरगळण्याचा धोका आहे. माझ्या डान्सर्सनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला, पण सर्वत्र गोंधळ होता. आम्ही याही परिस्थितीत आम्ही तुमचं मनोरंजन करण्यासाठी प्रयत्न करत होतो. कारण तुम्ही इथं माझ्यासाठी येता, आणि मी तुम्हाला यासाठी उत्तर देणे अपेक्षित आहे, हे मला माहीत आहे.”
मोनाली पुढे म्हणाली की, “मी अशी आशा करते की अशा सर्व कार्यक्रमाची जबाबदारी मी स्वतः घेऊ शकेन, त्यामुळे मला अशा ‘निरुपयोगी, बेजबाबदार ‘ लोकांवर अवलंबून राहण्याची वेळ माझ्यावर येणार नाही.” तिने चाहत्यांची माफी मागत कार्यक्रम बंद करण्याची घोषणा केली. ती म्हणाली, “मला खूप वाईट वाटत आहे की आम्हाला हा शो बंद करावा लागत आहे, पण मी नक्की परत येईन. आणि पुढच्यावेळी तुम्हाला या पेक्षा खूप चांगला कॉन्सर्ट करण्याचा प्रयत्न करेन. “
हेही वाचा…Video: “विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायकाचा दावा; म्हणाला…
मोनाली ठाकूरने ‘सवार लूं’, ‘जरा जरा टच मी’, ‘मोह मोह के धागे’,‘बद्री की दुल्हनिया’ अशी अनेक हिट गाणी दिली आहेत. तिला ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातील‘मोह मोह के धागे’ या गाण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.