Animal या संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचप्रमाणे हा सिनेमा चर्चेचाही विषय ठरला. अनेकांना हा सिनेमा आवडला तर अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली. त्यावेळी तमाशाने समाज बिघडत नाही आणि किर्तनाने सुधरत नाही अशा म्हणींचा वापर करुन एकमेकांना उपदेशाचे डोसही पाजले गेले. या सगळ्यावर लेखक, कवी जावेद अख्तर यांनी परखड भाष्य केलं आहे. Animal सारखे चित्रपट हिट होणं ही चिंतेची बाब आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी नववा अजंठा वेरुळ चित्रपट महोत्सव भरला आहे. त्यावेळी झालेल्या भाषणात जावेद अख्तर यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले आहेत जावेद अख्तर?
“हिरोची इमेज आहे ती काय योग्य आणि कसं असलं पाहिजे याची जाणीव ठेवून तयार केली पाहिजे. आजच्या लेखकांनी विचार करायला हवा. कारण त्यांच्यात गोंधळ वाढलेला आहे. याचं कारण समाज गोंधळात आहे. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे ते समाज ठरवत नाही तर त्याचं प्रतिबिंबच सिनेमात उमटतं. एक काळ होता जेव्हा गरीब चांगले होते आणि श्रीमंत वाईट. पण आज आपण कौन बनेगा करोडपती? असा प्रश्न विचारतो, त्यामुळे श्रीमंतांना आपण वाईट दाखवू शकत नाही. “
Animal सिनेमाविषयी परखड मत
“एका सिनेमातला एक पुरुष महिलेला म्हणतो की माझे बूट चाट, जर एक माणूस म्हणतो की महिलेला थोबाडीत ठेवून दिली तर काय बिघडलं. असे संवाद असणारा सिनेमा सुपरहिट होणं ही अत्यंत घातक बाब आहे. मला लोक म्हणतात आजकाल कशी गाणी ऐकू येतात? गाणी तर ७-८ लोक तयार करतात. चोली के पिछे क्या है? हे गाणं एका माणसाने लिहिलं होतं. दोघींनी त्यावर नाच केला. आणखी काही जणांनी त्याला संगीत दिलं. एक कॅमेरामन होता, आठ-नऊ लोक त्या गाण्यामागे होते. ते समस्या नाहीत. कोट्यवधी लोकांना ते गाणं आवडलं ही बाब जास्त चिंताजनक आहे.” असं परखत मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.
नेमक्या कुठल्या प्रसंगांविषयी जावेद अख्तर यांचं भाष्य?
Animal या सिनेमात तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूर या दोघांचा एक प्रसंग आहे. त्यात तृप्ती डिमरीने त्याला फसवल्याचं कळतं. तेव्हा तो ती सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्यावेळी Do You Love Me? Ok then Lick My Shoes. असा संवाद तो तिला म्हणतो. याच प्रसंगाचा उल्लेख करत जावेद अख्तर यांनी अशा प्रकारचा सिनेमा हिट होणं ही बाब चिंतेची आहे असं म्हटलं आहे.
प्रेक्षकांवर खूप मोठी जबाबदारी
“आजच्या घडीला आम्हाला असं वाटतं की सिनेमाची निर्मिती करणाऱ्यांपेक्षा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांवर आज खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. प्रेक्षकांनी हे ठरवायला हवं की कसे चित्रपट हवेत आणि कसे नकोत. काय नाकारायचं हा पूर्णपणे प्रेक्षकांचा अधिकार आहे. चेंडू हा सध्या प्रेक्षकांच्या कोर्टात आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके फिल्म मेकर्स चांगले चित्रपट आजही तयार करत आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर किती काळ उभे राहता यावर सिनेमाचं भवितव्य अवलंबून आहे.” असंही जावेद अख्तर म्हणाले आहेत.