२६ नोव्हेंबर २००८ हा मुंबई शहरासाठी काळा दिवस होता. १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ते समुद्रामार्गे शहरात शिरले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा यासह काही ठिकाणी बॉम्बहल्ले व गोळीबार केला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह जवळपास १९७ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावे लागले होते, तर ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. या १० दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजुनही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. या घटनेवर नंतर चित्रपट व बेव सीरिज बनले. त्या चित्रपटांची, सीरिजची नावं आणि ते कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतील, हे जाणून घेऊयात.
मेजर
२०२२ मध्ये आलेला हा चित्रपट मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. ते २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. यामध्ये मेजर यांचं बालपण, सैनिक होणं किती धोक्याचं असतं हे माहीत असतानाही देशसेवेची जिद्द, आई-वडिलांचा या निर्णयाला विरोध या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. संदीप उन्नीकृष्णन आपल्या पत्नी आणि पालकांपेक्षा आपल्या देशावर किती प्रेम करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. ते एनएसजीमध्ये मेजर होते. अनेकदा शत्रूंशी धाडसाने लढणारे मेजर उन्नीकृष्णन शेवटी ताज हॉटेलमध्ये लोकांना वाचवताना दहशतवादी हल्ल्यात शहीद होतात ही कहाणी यात पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेषने यात मुख्य भूमिका साकारली आहे. तर सई मांजरेकरने त्यांच्या पत्नीची भूमिका केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल.
‘द अटॅक्स ऑफ 26/11’
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द अटॅक्स ऑफ 26/11’ हा चित्रपट मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात दहा दहशतवाद्यांची कथा सांगण्यात आली आहे, जे मुंबईत प्रवेश करतात आणि हल्ला करतात. या हल्लेखोरांपैकी फक्त अजमल कसाब या एकमेव दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात यश आलं होतं, तेही यात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, आसिफ बसरा, संजीव जयस्वाल हे कलाकार होते. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
हॉटेल मुंबई
चार वर्षांपूर्वी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘हॉटेल मुंबई’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही दहशतवादी हल्ल्यावर बेतलेला होता. दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी हॉटेल कर्मचारी आपल्या पाहुण्यांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो. खासकरून तो एका ब्रिटीश जोडप्याला वाचवतो, त्याची संवेदनशील कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली होती. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल, नाझनीन बोनियादी, आर्मी हम्मेर, टिल्डा कोभाम, मनोज मेहरा, सुहेल नय्यर हे कलाकार होते. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले होते. हा चित्रपट तुम्ही झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
फँटम
२०१५ साली आलेला हा चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता. यात सैफ अली खानने डॅनियल नावाच्या एक अपमानित भारतीय सैनिकाची आणि कतरिना कैफने नवाज नावाची भूमिका साकारली होती. हे दोघेही अमेरिकन सुरक्षा एजन्सीसाठी काम करतात. २६/११ हल्ल्यातील संशयितांना मारण्याच्या धोकादायक मिशनवर जाताना त्यांना ज्या संकटांचा सामना करावा लागतो, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
मुंबई डायरीज 26/11 (वेब सीरिज)
निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांनी बनवलेली ‘मुंबई डायरीज 26/11’ ही या दहशतवादी हल्ल्यावर आधारित सर्वात गाजलेली वेब सीरिज आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर बॉम्बे जनरल हॉस्पिटलमध्ये कसं वातावरण होतं, त्याबाबत या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. आर्थिक राजधानी असलेल्या या मायानगरीने पाहिलेल्या सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्याची रात्र या सीरिजमध्ये उत्तम पद्धतीने दाखवण्यात आली आहे. ९ सप्टेंबर २०२१ रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे, मिशाल रहेजा, प्रकाश बेलावडी व रिद्धी डोगरा हे कलाकार होते.
ताज महाल
‘ताज महाल’ हा चित्रपटही २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित फ्रेंच चित्रपट आहे. या चित्रपटात एका १८ वर्षीय फ्रेंच तरुणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. या तरुणीचे आईवडील मुंबईत प्रेक्षणीय स्थळं पाहत असताना ही तरुणी मात्र दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या हॉटेलमध्ये कैद होते. तिचे असहाय पालक हॉटेलच्या बाहेर घडणाऱ्या दुःखद घटना पाहतात आणि त्यांची मुलगी सुरक्षित असावी यासाठी प्रार्थना करताना दिसतात. अनोळखी देशात पर्यटनासाठी आलेली तरुणी हॉटेलमध्ये अडकते आणि त्यानंतर तिथे जे काही घडतं त्याचा थरार यात दाखवण्यात आला आहे.